मोदींच्या 'मन की बात' कार्यक्रमाला अनुपस्थित विद्यार्थ्यांकडून १०० रुपये दंड
By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2023 02:53 PM2023-05-05T14:53:09+5:302023-05-05T14:53:32+5:30
येथील अकॅडमीतील विद्यार्थ्यांकडून प्रशासनाने १०० रुपये दंड आकारल्याचा आरोप करण्यात आला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा व्यक्तिश: जवळचा उपक्रम म्हणजे 'मन की बात'. नुकतेच मन की बात या कार्यक्रमाने शतक पूर्ण केले. या शतक महोत्सवी कार्यक्रमासाठी भाजपने देशभरात मोठी तयारी केली होती. अनेक राज्यात मुख्यमंत्र्यांसह विविध मंत्र्यांनी व भाजपच्या पदाधिकाऱ्यांनीही या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. शाळा, महाविद्यालयांतही हा उपक्रम उत्साहात पार पडला. मात्र, डेहरादूनच्या जीआरडी निरंजनपुर अकॅडमीत पंतप्रधान मोदींच्या 'मन की बात' कार्यक्रमाला विद्यार्थी उपस्थित राहिले नाहीत. म्हणून त्यांच्याकडून १०० रुपये दंड आकारण्यात आला आहे. यावरुन, आता पालकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
येथील अकॅडमीतील विद्यार्थ्यांकडून प्रशासनाने १०० रुपये दंड आकारल्याचा आरोप करण्यात आला आहे. नॅशनल एसोसिएशन फॉर पॅरेंट्स अँड स्टुडेंट्स राइट्सचे राष्ट्रीय अध्यक्ष आरिफ खान यांनी यासंदर्भात पत्र लिहिलं आहे. मुख्य शिक्षण अधिकारी डेहरादून यांना पत्र लिहून संबंधित शाळा प्रशासनावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्यानंतर, शिक्षण विभागाने या शाळेला नोटिस जारी करत तीन दिवसांत उत्तर मागितले आहे.
जीआरडी अकॅडमी शाळा प्रशासनाने 'मन की बात' उपक्रमाला गैरहजर राहिलेल्या विद्यार्थ्यांना १०० रुपये दंड आकारला आहे. तसेच, जे विद्यार्थी वैद्यकीय कारणास्तव गैरहजर होते, त्यांना मेडीकल प्रमाणपत्र देणे बंधनकारक केलं आहे. विशेष म्हणजे शाळेकडून शाळेच्या व्हॉट्असपग्रुवर मेसेज टाकून हा दंड आकारण्यात येत असल्याचा आदेश जारी करण्यात आला होता. विद्यार्थ्यांच्या पालकांनी त्या आदेशाचा स्क्रीनशॉटही सार्वजनिक केला आहे. त्यामुळे, आता या शाळा प्रशासनाच्या आदेशावर संताप व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, याप्रकरणी लेखी तक्रार प्राप्त होताच, मुख्य शिक्षणाधिकारी प्रदीप कुमार यांनी शाळा प्रशासनाला नोटीस जारी करत ३ दिवसांत उत्तर देण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, उत्तर न दिल्यास कारवाई करण्याचेही संकेत अधिकाऱ्यांनी दिले आहेत. तर, तक्रारकर्त्या संघटनेकडेही पुरावे मागितले आहेत.