पश्चिम बंगालला १००० कोटींची मदत; हवाई पाहणीनंतर पंतप्रधान मोदी यांची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2020 05:56 AM2020-05-23T05:56:18+5:302020-05-23T05:56:53+5:30
एकीकडे कोरोनाचा सामना करीत असताना नैसर्गिक संकटाला सामोरे जाणाऱ्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या प्रयत्नांचे मोदी यांनी कौतुक केले.
बशीरहाट : चक्रीवादळामुळे मोठे नुकसान झालेल्या पश्चिम बंगालसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १००० कोटी रुपयांची अंतरिम मदत जाहीर केली आहे. अॅम्फन चक्रीवादळाने राज्यात ८० जणांचा मृत्यू झाला आहे. राजधानी कोलकातासह दक्षिण भागातील अनेक जिल्ह्यांमध्ये मोठे नुकसान झाले आहे. मोदी यांनी राज्यपाल जगदीप धनखड आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासोबत चक्रीवादळामुळे प्रभावित झालेल्या भागाची हवाई पाहणी केली, तर या राज्याच्या पाहणीसाठी आता केंद्रीय पथक जाणार आहे.
उत्तर २४ परगणा जिल्ह्याच्या बशीरहाटमध्ये धनखड, ममता बॅनर्जी आणि राज्याचे प्रमुख अधिकारी यांच्यासह एका बैठकीत मोदी यांनी मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी दोन लाख रुपये आणि जखमींना ५० हजार रुपयांची मदत जाहीर केली.
एकीकडे कोरोनाचा सामना करीत असताना नैसर्गिक संकटाला सामोरे जाणाऱ्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या प्रयत्नांचे मोदी यांनी कौतुक केले.
मोदी यांनी व्हिडिओ संदेशात म्हटले आहे की, राज्याला १००० कोटी रुपये देण्याची घोषणा करीत आहे. याशिवाय कृषी, वीज आणि अन्य क्षेत्रातील नुकसानीची महिती घेतली जाईल. उत्तर व दक्षिण परगणा, पूर्व आणि पश्चिम मिदनापूर, कोलकाता, हावडा आणि हुगली जिल्ह्यात सार्वजनिक आणि खासगी संपत्तीचे मोठे नुकसान झाले आहे. मोदी म्हणाले की, राज्यातील नुकसानीची माहिती घेण्यासाठी केंद्र एक पथक तैनात करील. यावेळी केंद्रीय मंत्री बाबूल सुप्रियो, देबश्री चौधरी, प्रतापचंद्र सारंगी आणि धर्मेंद्र प्रधान यांची उपस्थिती होती.
500 कोटी रुपये ओडिशाला केंद्राकडून जाहीर
भुवनेश्वर : अॅम्फन वादळाचा मोठा फटका बसलेल्या ओडिशा राज्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी ५०० कोटी रुपयांचे आगाऊ आर्थिक साह्य जाहीर केले. वादळाचा फटका बसलेल्या भागाची मोदी यांनी हवाई पाहणी केल्यानंतर त्यांनी राज्यपाल गणेशी लाल आणि मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांची बैठक घेतली, त्यावेळी त्यांनी ही घोषणा केली. दीर्घकाळ चालणाºया पुनर्वसन उपाययोजनांसाठी आणखी मदत राज्य सरकारकडून अहवाल आल्यानंतर जाहीर केली जाईल, असे मोदी म्हणाले.