लसीची २५० रुपये किंमत ही लसउत्पादक कंपन्यांची फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2021 05:00 AM2021-03-02T05:00:45+5:302021-03-02T05:00:57+5:30
बायकॉनच्या अध्यक्ष किरण मजुमदार शॉ यांची टीका
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : केंद्र सरकारने खासगी रुग्णालये व आरोग्य केंद्रे येथे कोरोना लसीची किंमत २५० रुपये ठेवली आहे. ही किंमत इतकी कमी आहे की ते लसनिर्मिती कंपन्यांना परवडणारे नाही. केंद्र सरकारच्या निर्णयामुळे लस कंपन्यांना स्वत:ची फसवणूक झाल्यासारखे वाटत आहे, अशी टीका बायकॉन या कंपनीच्या अध्यक्ष किरण मजुमदार शॉ यांनी केली आहे.
त्या म्हणाल्या की, केंद्र सरकार लसनिर्मिती क्षेत्राला प्रोत्साहन देण्याऐवजी त्याचे खच्चीकरण करत आहे.
२५० रुपयांना कोरोना लस दिली, तर संबंधित लसनिर्मिती कंपनी फार काळ तग धरू शकणार नाही. जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना लसीची किंमत तीन डॉलरपर्यंत ठेवली आहे. मात्र भारताने त्याहीपेक्षा कमी म्हणजे फक्त दोन डॉलर इतकीच किंमत ठेवली आहे असेही किरण मजुमदार शॉ यांनी सांगितले.
तीव्र नाराजीचा सूर
कोरोना लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात ६० वर्षे वयावरील ज्येष्ठ नागरिक व एकाहून अधिक व्याधीने ग्रस्त असलेल्या ४५ वर्षांवरील वयाच्या लोकांना १ मार्चपासून कोरोना लस देण्यास सुरुवात झाली आहे.
अशा महत्त्वाच्या टप्प्यावर केंद्र सरकारने कोरोना लसीची किंमत खासगी रुग्णालये व आरोग्य केंद्रांमध्ये २५० रुपये ठेवण्याचा निर्णय घेतल्याने देशातील लसउत्पादक कंपन्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. त्याला बायकॉनच्या चेअरमन किरण मजुमदार शॉ यांनी वाचा फोडली.