फूलविक्रेत्याच्या पत्नीच्या बँक खात्यात ३० कोटी रुपये जमा झाले अन्...
By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2020 03:04 AM2020-02-06T03:04:35+5:302020-02-06T06:19:22+5:30
आपल्या पत्नीच्या खात्यावर चक्क ३० कोटी रुपये जमा झाल्याचे पाहून कर्नाटकमधील एका फूलविक्रेत्याला आश्चर्याचा जोरदार धक्का बसला.
बंगळुरू : आपल्या पत्नीच्या खात्यावर चक्क ३० कोटी रुपये जमा झाल्याचे पाहून कर्नाटकमधील एका फूलविक्रेत्याला आश्चर्याचा जोरदार धक्का बसला. चन्नपटणा येथील सईद मलिक बुऱ्हाण या फूलविक्रेत्यावर हा प्रसंग गुदरला आहे.
सईद यांची आर्थिक स्थिती ओढगस्तीची आहे. कुटुंबातील सदस्याच्या वैद्यकीय खर्चाचा भारही त्यांना पेलवेनासा झाला आहे. असे जिणे जगणाऱ्या सईद यांच्या घरी बँकेचे अधिकारी २ डिसेंबर रोजी आले. तुमच्या पत्नीच्या बँक खात्यात ३० कोटी रुपये जमा झाले असून, इतका पैसा आणला कुठून, अशी विचारणा करीत ते सईद यांच्याकडे चौकशी करू लागले.
सईद म्हणाले, बँक अधिकाऱ्यांनी मला व पत्नी रेहाना हिला आमची आधार कार्डे घेऊन बँकेत येण्यास सांगितले. तिथे काही कागदपत्रांवर सह्या करा, असे दडपण बँक कर्मचाऱ्यांनी आणले. मात्र, आम्ही सह्या करण्यास नकार दिला, असा दावा सईद यांनी केला. ते म्हणाले की, काही दिवसांपूर्वी एका ऑनलाईन पोर्टलच्या माध्यमातून मी पत्नीसाठी साडी खरेदी केली होती. त्यानंतर तुम्ही बक्षीस म्हणून कार जिंकली आहे, असे सांगणारा व पत्नीच्या बँक खात्याची माहिती विचारणारा फोन आला होता. त्यावेळी पत्नीच्या खात्यात अवघे ६० रुपये होते. त्यानंतर एकदम ३० कोटी रुपये जमा झाले.
कल्पनाच नव्हती
पोलिसांनी सांगितले की, सईद मलिक बुऱ्हाण यांच्या पत्नीच्या खात्यातून गेल्या काही दिवसांत अनेक व्यवहार झाले. मात्र, त्याची सईद व त्यांच्या पत्नीला कल्पनाच नव्हती. याप्रकरणी पुढील तपास सुरू असून, आरोपींवर कडक कारवाई करण्यात येईल.