मल्ल्याचे ५१५ कोटी रुपये रोखले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2017 12:39 AM2017-07-20T00:39:42+5:302017-07-20T00:39:42+5:30
ब्रिटिश मद्य कंपनी ‘डियाजिओ’ने विजय मल्ल्याला देय असलेली ३५ दशलक्ष डॉलरची रक्कम न देण्याचा निर्णय घेतला आहे. युनायटेड स्पिरिट्स लिमिटेडमधून बाहेर
नवी दिल्ली : ब्रिटिश मद्य कंपनी ‘डियाजिओ’ने विजय मल्ल्याला देय असलेली ३५ दशलक्ष डॉलरची रक्कम न देण्याचा निर्णय घेतला आहे. युनायटेड स्पिरिट्स लिमिटेडमधून बाहेर पडण्याच्या बदल्यात मल्ल्याला ७५ दशलक्ष डॉलर (५१५ कोटी रुपये) देण्याचे डियाजिआने मान्य केले होते. यापैकी ३५ दशलक्ष डॉलर देणे अजून बाकी आहे. तथापि, डियाजिओच्या नव्या भूमिकेमुळे ही रक्कम मल्ल्याला मिळण्याची शक्यता आता दुरावली आहे.
डियाजिओशी संबंधित सूत्रांनी सांगितले की, या व्यवहारापोटी मल्ल्याला दिलेली रक्कम वसूल करण्याचा मार्गही डियाजिओ तपासत आहे. या व्यवहारापोटी मल्ल्या यांना ४० दशलक्ष डॉलर डियाजिआने दिले आहेत. उरलेले ३५ लाख डॉलर दोन समान हप्त्यांत देण्यात येणार होते. तथापि, मल्ल्याने करारातील अटींचा भंग केल्यामुळे उरलेली रक्कम रोखण्याचा निर्णय कंपनीने घेतला. मल्ल्याने कोणत्या अटींचा भंग केला, याचा खुलासा सूत्रांनी केला नाही.
- भाग विकून पलायन
आपल्या अनेक कंपन्या तोट्यात गेल्यानंतर विजय मल्ल्याने युनायटेड स्पिरिट्समधील आपले आणि आपल्या कुटुबांच्या मालकीचे समभाग डियाजिओला विकून विदेशात पलायन केले आहे.