गोदावरी नदीच्या पुरामुळे आंध्र प्रदेशमध्ये 600 कोटी रुपयांचे नुकसान
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2018 02:52 PM2018-08-23T14:52:09+5:302018-08-23T14:53:21+5:30
आंध्र प्रदेशात पुरामुळे पिकांचे 600 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी दिली आहे.
हैदराबाद- केरळमध्ये आलेल्या प्रचंड पुरामुळे संपूर्ण केरळ राज्यातील जनजीवन उद्धवस्त झाले आहे. त्याचप्रमाणे जोरदार पावसामुळे कर्नाटकच्या कोडुगू जिल्ह्यातही कॉफी आणि मसाल्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. यापाठोपाठ आता गोदावरी नदीला आलेल्या पुरामुळे आंध्र प्रदेश राज्यातही मोठे नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे. आंध्र प्रदेशात पुरामुळे पिकांचे 600 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी दिली आहे.
चंद्राबाबू नायडू यांच्या सरकारने शेतकऱ्यांना प्रतीहेक्टर 25 हजार रुपये मदत देण्याची घोषणा केली आहे. पूर्वगोदावरीच्या 19 मंडलपैकी 43 गावे आणि पश्चिम गोदावरी जिल्ह्यातील 25 मंडलातील 197 गावांमध्ये पुरामुळे नुकसान झाल्याचे नायडू यांनी सांगितले आहे. नायडू यांनी पूरग्रस्त भागाची पाहाणी करुन राजमहेंद्रावरम येथे अधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि मदतकार्याची माहिती माध्यमांना दिली. पूर्व गोदावरी जिल्ह्यात 6400 हेक्टर भातशेती व फळबागांचे नुकसान ढासे आहे.
49 गावांचा संपर्क तुटला असून 16 निवाराछावण्यांमध्ये 2912 लोकांना आश्रय़ देण्यात आला आहे. यापुरामुळे 250 घरांचे नुकसान झाले आहे. या घरांच्या पुनर्बांधणीसाठी सरकार 1.50 लाख रुपयांची मदत करणार आहे.