भुकेल्या बकरीने फस्त केले 66 हजार रूपये
By admin | Published: June 7, 2017 09:42 PM2017-06-07T21:42:26+5:302017-06-07T21:42:26+5:30
जेव्हा एखाद्या बकरीला भूक लागते तेव्हा तीला काय खायला आवडतं? प्रश्न खूप साधा आहे पण जर का उत्तर दोन हजाराच्या नोटा असं मिळालं तर नक्कीच अजब वाटतं.
Next
ऑनलाइन लोकमत
लखनऊ, दि. 7 - जेव्हा एखाद्या बकरीला भूक लागते तेव्हा तीला काय खायला आवडतं? प्रश्न खूप साधा आहे पण जर का उत्तर दोन हजाराच्या नोटा असं मिळालं तर नक्कीच अजब वाटतं. उत्तर प्रदेशच्या कन्नोज जिल्ह्यातील सिलुआपूर गावात अशीच काहीसी घटना घडली आहे. येथील बकरीने दोन हजाराच्या एक-दोन नाही तर 33 नोटा खाल्ल्या. म्हणजे त्या भूकेल्या बकरीने तब्बल 66 हजार रूपये फस्त केले.
‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या वृत्तानुसार, उत्तर प्रदेशच्या कन्नोज जिल्ह्यातील सिलुआपूर गावात ही घटना घडली. येथील शेतकरी सर्वेश कुमार यांनी दोन हजाराच्या 33 नोटा आपल्या पॅंटच्या खिशात ठेवल्या होत्या. घराचं बांधकाम करण्यासाठी विटांची खरेदी करता यावी यासाठी त्यांनी हे पैसे जवळ ठेवले होते. पँटच्या खिशात पैसे ठेवून ते अंघोळीसाठी गेले. तेवढ्या वेळेत शेळीने हे पैसे खाल्ले. बाहेर आल्यावर पॅंटजवळ उभी असलेली बकरी काहीतरी पैसे खात असल्याचं लक्षात येताच त्यांनी पैसे वाचवण्याचा प्रयत्न केला पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. ते केवळ दोनच नोटा वाचवू शकले.
पैसे पँटच्या खिशात ठेवलेले होते. शेळी या प्रकारचे कागद खात असते, त्यामुळेच या पैशांवर नजर जाताच तिने ते कागद समजून खाल्ले. मात्र आता काहीही करु शकत नाही. शेळीने 2 हजार रुपयांच्या नोटा चावून खाल्ल्या, अशी माहिती सर्वेश कुमार यांनी दिली.
66 हजार रूपये फस्त करणा-या या बकरीची चर्चा सध्या गल्लीपासून दिल्लीपर्यंत सुरु आहे.