हिमाचलमध्ये ८,००० कोटी रुपयांचे नुकसान : मुख्यमंत्री सुक्खू
By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2023 05:44 AM2023-07-16T05:44:42+5:302023-07-16T05:45:10+5:30
पंजाबमधील विविध पूरग्रस्त जिल्ह्यांमधून २२ हजारांहून अधिक लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले
चंडीगड/शिमला/फिरोजपूर/डेहराडून : पंजाब आणि हरयाणाच्या अनेक भागात आता पुराचे पाणी ओसरू लागले असून, दोन्ही राज्यांतील पूरग्रस्त भागात मदतकार्य सुरू आहे. आठवड्याच्या सुरुवातीला झालेल्या मुसळधार पावसामुळे हरयाणा आणि पंजाबमधील अनेक भागात पाणी साचले होते. पूरग्रस्त भागात जलजन्य आजारांचा धोका आहे, त्यामुळे प्रादुर्भाव टाळण्यासाठी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना योग्य ती पावले उचलण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पंजाब आणि हरयाणामध्ये पाऊस आणि पूरसंबंधित घटनांमध्ये किमान ३९ लोकांचा मृत्यू झाला.
पंजाबमधील विविध पूरग्रस्त जिल्ह्यांमधून २२ हजारांहून अधिक लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले, तर हरयाणामधून ४,४९५ लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे.
हिमाचल प्रदेशमध्ये आठ हजार कोटींचे नुकसान
हिमाचल प्रदेशचेमुख्यमंत्री सुखविंदरसिंह सुक्खू यांनी सांगितले की, अतिवृष्टीमुळे राज्याचे सुमारे आठ हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. मुख्यमंत्र्यांनी केंद्राकडे दोन हजार कोटी रुपयांची मागणी केली आहे. तर दुसरीकडे त्यांनी राज्यात डिझेलवरील व्हॅट तीन रुपयांनी वाढविला आहे.
उत्तराखंडमध्ये मंत्र्यांना आपापल्या जिल्ह्यात जाण्याचे निर्देश
उत्तराखंडमधील मंत्र्यांनी आपापल्या जिल्ह्यात जाऊन मदतकार्याला गती द्यावी, असे निर्देश मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी शनिवारी दिले आहेत. डेहराडूनसह सात जिल्ह्यांत १६ आणि १७ जुलै रोजी काही ठिकाणी मुसळधार, तर काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.