Amul कंपनीचे एमडी RS Sodhi यांचा १२ वर्षांनंतर अचानक राजीनामा, नेमकं कारण काय? वाचा...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2023 07:06 PM2023-01-09T19:06:34+5:302023-01-09T19:08:04+5:30
देशात दूधाचा पुरवठा करणारी दिग्गज कंपनी अमूल लिमिटेडच्या (Amul Limited) व्यवस्थापकीय मंडळात एक मोठा बदल करण्यात आला आहे.
नवी दिल्ली-
देशात दूधाचा पुरवठा करणारी दिग्गज कंपनी अमूल लिमिटेडच्या (Amul Limited) व्यवस्थापकीय मंडळात एक मोठा बदल करण्यात आला आहे. कंपनीचे एमडी आरएस सोधी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर सोधी यांच्या जागी आता GCMMF चे सीओओ जयन मेहता यांच्याकडे कंपनीच्या एमडी पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. सोधी हे २०१० सालापासून कंपनीच्या संचालकपदी होते.
पीटीआयच्या माहितीनुसार, अमूल कंपनीत सिनिअर सेल्स मॅनेजर पदापासून करिअरची सुरुवात केलेल्या सोधी यांना जून २०१० साली कंपनीनं प्रमोशन देत एमडी बनवलं होतं. चार वर्षांपूर्वी त्यांच्या एमडी पदाचा कार्यकाळ पाच वर्षांनी पुन्हा वाढवण्यात आला होता. गुजरात को-ऑपरेटीव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशनच्या बैठकीमध्ये त्यांनी दिलेल्या राजीनामा स्वीकारण्यात आला आहे. अमूल ब्रँडचं काम सांभाळणारी ही मूळ कंपनी आहे.
सोधी यांचं करिअर
आरएस सोधी यांचं पूर्ण नाव डॉ. रुपिंदर सिंग सोधी असं आहे. त्यांनी पहिल्यांदा १९८२ साली अमूल कंपनीत एन्ट्री घेतली. २०००-२००४ पर्यंत त्यांनी जनरल मार्केटिंग मॅनेजर पद सांभाळलं. त्यानंतर जून २०१० साली त्यांना एमडी पदाची जबाबदारी देण्यात आली. जुलै २०२२ मध्ये त्यांना देशातील डेअर उद्योगाची प्रमुख असलेल्या इंडियन डेअर असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवडण्यात आलं होतं.
बोर्ड बैठकीत राजीनामा स्वीकारला
GCMMF बोर्डाचे चेअरमन शामलभाई पटेल आणि व्हाइस चेअरमन वालमभाई हम्बल यांच्या नेतृत्वात झालेल्या बैठकीत सोधी यांचा राजीनामा स्वीकारला गेला. आरएस सोधी यांच्या राजीनाम्यानंतर त्यांच्या जागी आता जयन मेहता यांना प्रभारी जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
अमूल दररोज किती दूध सप्लाय करतं?
गेल्या सात दशकांहून अधिक काळापासून अमूल ब्रँड देशात घरोघरी पोहोचला आहे. अूल गुजरात, दिल्ली-एनसीआर, पश्चिम बंगाल आणि मुंबईसह देशातील अनेक मोठ्या बाजारपेठांमध्ये दूधाचा पुरवठा करतं. कंपनी दररोज जवळपास १५० लाख लीटरहून अधिक दूध पुरवते. यात एकट्या दिल्ली-एनसीआर भागात जवळपास ४० लाख लीटर दूधाचा पुरवठा केला जातो.