पाचशेच्या नोटांच्या छपाईवर ५००० कोटी खर्च, केंद्र सरकारची लोकसभेत माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2017 01:09 AM2017-12-20T01:09:20+5:302017-12-20T01:10:11+5:30
गेल्या वर्षी नोटाबंदीनंतर ५०० रुपयांच्या नव्या नोटांची छपाई करण्यासाठी सुमारे ५ हजार कोटी रुपये खर्च आला, असे केंद्र सरकारच्या वतीने लोकसभेत सांगण्यात आले.
नवी दिल्ली : गेल्या वर्षी नोटाबंदीनंतर ५०० रुपयांच्या नव्या नोटांची छपाई करण्यासाठी सुमारे ५ हजार कोटी रुपये खर्च आला, असे केंद्र सरकारच्या वतीने लोकसभेत सांगण्यात आले.
वित्त राज्यमंत्री पी. राधाकृष्णन यांनी प्रश्नाच्या लेखी उत्तरात सांगितले की, रिझर्व्ह बँकेने ५०० रुपयांच्या १,६९५.७ कोटी नव्या नोटा या वर्षी ८ डिसेंबरपर्यंत छापल्या. त्यावर ४,९६८.८४ कोटी रुपये खर्च झाला. दोन हजार रुपयांच्या ३६५.४ कोटी नोटा छापण्यात आल्या. त्यावर १,२९३.६ कोटी रुपये खर्च झाला. तसेच २०० रुपयांच्या १७८ कोटी नोटा छापण्यात आल्या त्यावर ५२२.८३ कोटी रुपये खर्च झाला. नोटाबंदीनंतर ५०, २००, ५०० आणि २,००० दर्शनी मूल्याच्या नोटा नव्या डिझाइनमध्ये आणण्यात आल्या, असे सरकारने सांगितले. अन्य प्रश्नाच्या उत्तरात राधाकृष्णन यांनी सांगितले की, रिझर्व्ह बँकेकडून सरकारला मिळणारा लाभांश २०१६-१७ मध्ये घसरून ३५,२१७ कोटी रुपयांवर आला. नव्या नोटांच्या छपाईवर झालेल्या अतिरिक्त खर्चामुळे लाभांशाची रक्कम घटली आहे. सन २०१५-१६ मध्ये रिझर्व्ह बँकेने सरकारला ६५ हजार ८७६ कोटी रुपये लाभांश दिला होता. मोदी सरकारने ८ नोव्हेंबर २०१६ रोजी १,००० आणि ५०० रुपयांच्या नोटा बंद केल्या होत्या. त्यामुळे चलनातील सुमारे ८६ टक्के नोटा गायब झाल्या होत्या. बंद करण्यात आलेल्या नोटांपैकी ९९ टक्के नोटा लोकांनी बँकांत जमा केल्यांनंतर रिझर्व्ह बँकेकडे परत आल्या आहेत.
१५.२८ लाख कोटी आले परत-
मंत्र्यांनी सभागृहास सांगितले की, ३० जून २०१७ रोजीच्या आकडेवारीनुसार १५.२८ लाख कोटी रुपयांच्या बाद नोटा रिझर्व्ह बँकेला परत मिळाल्या आहेत. पडताळणी प्रक्रियेत या आकड्यात बदल होऊ शकतो. पुनर्मुद्रीकरण प्रक्रियेत रिझर्व्ह बँकेने ५०० आणि ५० रुपयांच्या नव्या नोटा चलनात आणल्या. तसेच २,००० आणि २०० च्या नोटा प्रथमच चलनात आणल्या.