शाहांच्या उपस्थितीत भाजपा-संघाची बैठक; राम मंदिरावर चर्चा नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2018 07:49 AM2018-10-25T07:49:13+5:302018-10-25T07:52:27+5:30
बैठकीला भाजपा, संघाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची उपस्थिती
लखनऊ: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या महत्त्वपूर्ण बैठकीला भाजपाचे पदाधिकारीदेखील उपस्थित होते. दिल्ली काबीज करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या उत्तर प्रदेशात नेमकी काय रणनिती असावी, यावर या बैठकीत खल झाला. मात्र यामध्ये राम मंदिराच्या मुद्यावर चर्चा झाली नाही. सरसंघचालक मोहन भागवत यांनी दसरा मेळाव्यात राम मंदिराच्या मुद्यावर विशेष भर दिला होता. मात्र अमित शहांसमोर संघाच्या पदाधिकाऱ्यांनी राम मंदिराचा विषय उपस्थित केला नाही.
लखनऊमधील आनंदी वॉटर पार्कमध्ये आयोजित करण्यात आलेल्या बैठकीला अमित शहांसह, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, संघ आणि भाजपाचे वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत संघाच्या पदाधिकाऱ्यांनी योगी सरकारच्या कामाचं कौतुक केल्याची माहिती भाजपाच्या नेत्यानं दिली. आगामी लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणनिती काय असावी, केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना जनतेपर्यंत प्रभावीपणे कशा पोहोचवल्या जाव्यात, याबद्दल या बैठकीत चर्चा झाली.
संघ आणि भाजपा पदाधिकाऱ्यांमधील या बैठकीनंतर संघाचे सह सरकार्यवाह कृष्ण गोपाल यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ही नियमित बैठक होती. भविष्यातील योजना काय असाव्यात, याची चर्चा या बैठकीत झाली, अशी माहिती गोपाल यांनी दिली. या बैठकीत राम मंदिराबद्दल चर्चा झाली का, असा प्रश्न यावेळी पत्रकारांनी विचारला. यावर गोपाल यांनी नाही, असं उत्तर दिलं. ही बैठक राजकीय स्वरुपाची नव्हती, असंदेखील ते म्हणाले.