आरएसएसची 15 मार्चपासून वार्षिक बैठक; CAA आंदोलन, दिल्ली हिंसा गाजणार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2020 12:03 PM2020-03-02T12:03:14+5:302020-03-02T13:06:28+5:30
दिल्लीत नुकतीच झालेली हिंसा आणि नागरिकता संधोधन कायदा याविरुद्ध सुरू असलेल्या आंदोलनांवर बैठकीच्या बौधिक सत्रात चर्चा होण्याची शक्यता आहे.
नवी दिल्ली - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे निर्णय घेणाऱ्या प्रतिनिधी सभेच्या तीन दिवसीय वार्षिक बैठकीला येत्या 15 मार्चपासून सुरुवात होणार आहे. या बैठकीत नागरिकता संधोधन कायदा आणि दिल्लीतील हिंसाचार हे मुद्दे गाजण्याची शक्यता आहे.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अखिल भारतीय प्रतिनिधी सभेची वार्षिक बैठक बंगळुरू येथे 15 ते 17 मार्च या कालावधीत होणार आहे. प्रतिनिधी सभा राष्ट्रीय स्वयंसेवक संघात निर्णय घेणारी प्रमुख संस्था आहे. निर्णय घेण्यासाठी आणि भविष्यातील कार्यवाहीसंदर्भात दिशा ठरविण्यासाठी वर्षातून एकदा अशी सभा आयोजित करण्यात येते.
भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा आणि महासचिव बीएल संतोष या बैठकीला उपस्थित राहण्याची शक्यता सुत्रांनी व्यक्त केली आहे. तसेच दिल्लीत नुकतीच झालेली हिंसा आणि नागरिकता संधोधन कायदा याविरुद्ध सुरू असलेल्या आंदोलनांवर बैठकीच्या बौधिक सत्रात चर्चा होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर दिल्लीतील संघ व्यवस्थापनाला दिल्लीतील हिंसेवर सविस्तर अहवाल सादर करण्यास सांगण्यात येऊ शकते. या बैठकीत संघाचे संघटन कधीही न गेलेल्या भागात पोहचविण्यासाठी आणि जनसंपर्क वाढविण्यासाठी उपाय योजना करण्यासंदर्भात वार्षिक बैठकीत चर्चा होऊ शकते.