'RSSमुळे देशात दंगली होतात, या संघटनेवर आधी बंदी घालावी', लालूंची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2022 02:17 PM2022-09-28T14:17:14+5:302022-09-28T14:17:42+5:30

PFIवरील कारवाईबाबत प्रश्न विचारला असता, लालू प्रसाद यादवांनी आरएसएसवर बंदी घालण्याची मागणी केली आहे.

'RSS causes riots in the country, this organization should be banned first', Lalu Prasad Yadav's demand | 'RSSमुळे देशात दंगली होतात, या संघटनेवर आधी बंदी घालावी', लालूंची मागणी

'RSSमुळे देशात दंगली होतात, या संघटनेवर आधी बंदी घालावी', लालूंची मागणी

Next

नवी दिल्ली: दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असल्याच्या आरोपानंतर केंद्र सरकारने पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियावर (PFI) पाच वर्षांसाठी बंदी घातली आहे. एकीकडे बिहार भाजपच्या नेत्यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे, तर दुसरीकडे माजी मंत्री आणि आरजेडी प्रमुख लालू प्रसाद यादव यांनी या कारवाईवरुन प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. 

दिल्लीत लालू प्रसाद यादव यांनी माध्यमांशी संवाद साधला. पत्रकारांनी त्यांना पीएफआयवरील बंदीबाबत विचारले असता ते म्हणाले की, 'जर बंदी घालायची असेल तर आधी आरएसएसवर बंदी घालावी. आरएसएस ही निरुपयोगी संघटना आहे. त्यांच्यामुळेच देशात दंगली होतात. आता देशाला एकत्र करायचे असेल, तर सर्व विरोधी पक्षांना एकत्र यावे लागेल. आम्ही सर्व एकत्र येऊ आणि हे नरेंद्र मोदींचे सरकार पाडू,' अशी प्रतिक्रिया लालूंनी दिली. 

लालू यादव 12व्यांदा राजदचे अध्यक्ष होणार 
लालू प्रसाद यादव यांनी आज दिल्लीत राजद अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला. यावेळी राजदचे प्रदेशाध्यक्ष जगदानंद सिंह, लालूंच्या कन्या मीसा भारती, आमदार सुनील सिंह उपस्थित होते. लालू हे राजदच्या स्थापनेपासून राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष आहेत. लालूंची आता पुन्हा एकदा बिनविरोध राजदचे राष्ट्रीय अध्यक्ष होणार आहेत. पक्षाध्यक्षपदाची त्यांची ही 12वी टर्म आहे. 

लालूंना परदेशात जाण्याची परवानगी मिळाली
दरम्यान, बुधवारीच दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टाने आयआरसीटीसी घोटाळ्यातील आरोपी आरजेडी प्रमुख लालू यादव यांना उपचारासाठी परदेशात जाण्याची परवानगी दिली आहे. लालूंच्या वतीने 10 ऑक्टोबर ते 25 ऑक्टोबर दरम्यान उपचारासाठी सिंगापूरला जाण्यासाठी कोर्टात परवानगी मागितली होती. लालू यादव सध्या आयआरसीटीसी घोटाळ्याप्रकरणी सीबीआय आणि ईडी प्रकरणात जामिनावर बाहेर आहेत.

Web Title: 'RSS causes riots in the country, this organization should be banned first', Lalu Prasad Yadav's demand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.