बोलण्यात आणि लिहिताना 'इंडिया' नाही फक्त भारत म्हणा, हे देशाचे जुने नाव आहे - मोहन भागवत
By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2023 03:36 PM2023-09-02T15:36:01+5:302023-09-02T15:36:38+5:30
mohan bhagwat rss : भाजपाला रोखण्यासाठी देशातील विरोधी पक्षांनी एकजुट दाखवली असून त्यांच्या आघाडीला I.N.D.I.A. असे नाव दिले आहे.
गुवाहाटी : लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजपाला रोखण्यासाठी देशातील विरोधी पक्षांनी एकजुट दाखवली असून त्यांच्या आघाडीला I.N.D.I.A. असे नाव दिले आहे. यावरून भाजपा सातत्याने विरोधकांवर टीका करत आहे. अशातच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) प्रमुख मोहन भागवत यांनी एक मोठं विधान केलं आहे. गुवाहाटीमध्ये सरसंघाचे नेते मोहन भागवत यांनी लोकांना 'इंडिया'ऐवजी भारत बोलण्याचे आवाहन केलं आहे. आपल्या देशाचं नाव इंडिया नसून भारत आहे, असं भागवत यांनी सांगितलं.
मोहन भागवत म्हणाले की, शतकानुशतके या देशाचे नाव भारत आहे, 'इंडिया' नाही. म्हणून आपण देशाचे जुने नाव वापरावे. बोलताना आणि लिहिताना सर्वत्र भारत असा उल्लेख करावा. गुवाहाटी येथे जैन समाजाच्या एका कार्यक्रमात मोहन भागवत यांनी हे वक्तव्य केले. "शतकानुशतके आपल्या देशाचे नाव भारत आहे. भाषा कोणतीही असो, नाव तेच राहते. आपला देश भारत आहे आणि आपण इंडिया हा शब्द वापरणं बंद केलं पाहिजे. सर्व व्यावहारिक क्षेत्रात भारत हा शब्द वापरण्यास सुरुवात केली पाहिजे. तरच हा बदल घडेल. आपल्याला आपल्या देशाला भारत म्हणायचे आहे आणि इतरांनाही ते समजून सांगायला हवं", असंही RSS प्रमुखांनी नमूद केलं. अलीकडेच मोहन भागवत यांनी भारत हे 'हिंदू राष्ट्र' असून सर्व भारतीय हिंदू आहेत आणि सर्व भारतीय हिंदुत्वाचे प्रतिनिधित्व करतात. असं विधान केलं होतं.
VIDEO | "We all should stop using the word 'India' and start using 'Bharat'. The name of our country has been 'Bharat' for ages. Whatever may be the language, the name remains the same," says RSS chief Mohan Bhagwat at an event organised by 'Sakal Jain Samaj' in Assam's Guwahati. pic.twitter.com/EhwfW5WIAP
— Press Trust of India (@PTI_News) September 2, 2023
भारतातील प्रत्येक व्यक्ती हिंदू - भागवत
मोहन भागवत नागपूरच्या कार्यक्रमात म्हणाले होते की, भारतातील प्रत्येक व्यक्ती हिंदू संस्कृती, हिंदू पूर्वज आणि हिंदू भूमीचा आहे. तसेच भारत हे हिंदू राष्ट्र आहे आणि ही वस्तुस्थिती आहे. वैचारिकदृष्ट्या सर्व भारतीय हिंदू आहेत आणि हिंदूचा अर्थ सर्व भारतीय. जे आज भारतात आहेत ते सर्व हिंदू संस्कृतीचे, हिंदू पूर्वजांचे आणि हिंदू भूमीचे आहेत आणि दुसरे काहीही नाही. काही लोकांना ते समजले आहे, तर काहीजण त्यांच्या सवयी आणि स्वार्थामुळे समजल्यानंतरही त्याची अंमलबजावणी करत नाहीत. याशिवाय काही लोकांना ते अद्याप समजले नाही किंवा ते विसरले आहेत.