गायींची काळजी घेणार्या कैद्यांमध्ये गुन्हेगारी प्रवृत्ती कमी होते: मोहन भागवत
By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2019 03:47 PM2019-12-08T15:47:12+5:302019-12-08T15:49:06+5:30
गो संरक्षण करणारी व्यवस्था निर्माण करणे गरजेचे आहे व ते शक्य असल्याचे भागवत म्हणाले.
नवी दिल्ली : कारागृहात बंद असलेल्या कैद्यांना गायींची काळजी घेण्याचे काम दिल्यानंतर त्यांच्यातील गुन्हेगारी प्रवृत्ती कमी होते. त्यामुळे गोपालन केलं पाहिजे असा दावा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी केला आहे.तर गायीला कत्तलखान्यात पोहोचवणारेही हिंदूच आहेत, अशी खंत सुद्धा भागवत यांनी व्यक्त केली.
पुण्यातील गो विज्ञान संशोधन संस्था व दादरा नगर हवेली मुक्ती संग्राम समिती यांच्या वतीने डीपी रस्त्यावरील शुभारंभ लॉन्स येथे भागवत यांच्या हस्ते शनिवारी मोरोपंत पिंगळे गोसेवा पुरस्कार देण्यात आले. यावेळी बोलताना भागवत म्हणाले की, गोपालन केल्याने कारागृहातील कैद्यांमध्ये वेगाने सुधारणा होते. तसेच यामुळे त्यांच्यातील गुन्हेगारी प्रवृत्ती कमी होते. विशेष म्हणजे ही माहिती तुरुंगाधिकाऱ्यांनीच मला दिली असल्याचा दावा सुद्धा भागवत यांनी केला. समाज जागृत झाला तर कोणीही गाय कापायला पाठवणार नाही. असेही ते म्हणाले.
देशी गाईंवर आधारीत शेतीतून पिकणारे धान्य विषमुक्त होते, आता खतांमधून तयार होणारे धान्य विषयुक्त आहे. कत्तलखान्यात जाणाऱ्या गाई वाचवल्या तर त्या पाळण्यासाठी कोणी तयार होत नाही. कत्तलखान्यात गाई नेणारेही हिंदू ठेकेदारच असतात. म्हणूनच गो संरक्षण करणारी व्यवस्था निर्माण करणे गरजेचे आहे व ते शक्य असल्याचे भागवत म्हणाले.
देशात केवळ ४५ हजार गायी शिल्लक आहेत. तर देशात गोसंवर्धनाचा प्रश्न उभा राहिला आहे. गायीला माता मानत असूनही कोणीही गाय पाळायला तयार नाही, हे समस्येचे खरे मूळ आहे. आपण केवळ दुधासाठी गाय पाळत नाही. गाय, गोमूत्र आणि शेण या माध्यमातून सभोवतालचं पावित्र्य राखले जाते, असेही भागवत म्हणाले.