सरकारचं पाऊल डगमगल्यास संघ देणार सकारात्मक सल्ला- मोहन भागवत
By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2019 07:38 AM2019-06-04T07:38:06+5:302019-06-04T07:38:17+5:30
लोकसभा निवडणुकीत भाजपानं देदीप्यमान यश मिळवलं.
नवी दिल्लीः लोकसभा निवडणुकीत भाजपानं देदीप्यमान यश मिळवलं. या यशाचं श्रेय कुठे तरी आरएसएसलाही दिलं जातंय. आता मोहन भागवत म्हणाले की, जर सरकारचं पाऊल डगमगत असल्याचं दिसल्यास संघाकडून त्यांना सकारात्मक दृष्टिकोन आणि योग्य सल्ला देण्यात येईल. कानपूरच्या पं. दीनदयाल उपाध्याय सनातन धर्म विद्यालयाच्या संघ शिक्षावर्गाला संबोधित करताना ते बोलत होते.
जे लोकशाही व्यवस्थेतून निवडून येतात, त्यांच्याकडे भरपूर अधिकार असतात. त्याचा अर्थ असा नाही की, त्या अधिकारांचा गैरवापर केला जावा. जर कोणत्याही कारणास्तव सरकारचं पाऊल डगमगलं तर संघ त्यांना सकारात्मक सल्ला देईल. आपल्या माणसांबरोबर नेहमीच सकारात्मक भूमिका घेतली पाहिजे. जर कोणत्याही कारणास्तव निराशा असल्यास तसं सरकारनं आम्हाला सांगावं, असंही मोहन भागवत म्हणाले आहेत.
आम्ही संघाचं केंद्र नागपूरहून हलवून दिल्ली करू शकतो. परंतु असं न करणं केव्हाही चांगलंच राहील. स्वयंसेवकांना उद्देशून मोहन भागवत म्हणाले, कितीही चांगलं काम केलं असलं किंवा इतरांची मदत केली असली तरी कधीही कोणत्याही गोष्टीचा अहंकाराला बाळगू नका. इतरांना उपकाराच्या भावनेनं मदत करण्याची प्रवृत्ती प्रत्येकामध्ये असली पाहिजे. संघाच्या कार्यांचा विस्तार झाला असून, स्वयंसेवकांचा मानही आता वाढला आहे, हे ऐकून फारच आनंद झाला. संघप्रमुख मोहन भागवत शनिवारीच कानपूरला आले आहेत. ते संघाकडून 24 मे ते 13 जूनपर्यंत चालणाऱ्या प्रशिक्षण शिबिराला उपस्थिती दर्शवण्यासाठी पोहोचले होते.