RSS Mohan Bhagwat: “मुलांना धर्माचा अभिमान बाळगण्यासाठी आपण तयार करत नाही, लग्नासाठी धर्मांतर ही मोठी चूक”
By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2021 10:56 AM2021-10-11T10:56:47+5:302021-10-11T10:57:53+5:30
RSS Mohan Bhagwat: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी उत्तराखंड येथील एका कार्यक्रमात बोलताना धर्मांतरासंदर्भात मोठे विधान केले आहे.
देहरादून:राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत यांनी (Mohan Bhagwat) उत्तराखंड येथील एका कार्यक्रमात बोलताना धर्मांतरासंदर्भात मोठे विधान केले आहे. हिंदू कुटुंब आपल्या मुलांना धर्माचा अभिमान बाळगण्यासंबंधी, परंपरा आणि मूल्यांचं शिक्षण देत नाहीत, असे सांगत लग्नासाठी अन्य धर्मांत धर्मांतरण करणारे हिंदू मोठी चूक करत आहेत, असे मोहन भागवत यांनी म्हटले आहे. हिंदूच्या धर्मांतराबाबत मोहन भागवत यांनी नाराजी व्यक्त केल्याचे सांगितले जात आहे.
धर्मांतर कसे काय होते? आपल्या देशातील मुले, मुली इतर धर्मात कसे काय जातात? छोट्या छोट्या स्वार्थांसाठी, लग्न करण्यासाठी धर्मांतर करणे चुकीचे आहेत. हा मुद्दा वेगळा आहे की, आपण आपली मुले तयार करत नाही, असे मोहन भागवत यांनी म्हटले आहे. भाजपाशासित राज्यांमध्ये कथित ‘लव्ह जिहाद’विरोधात कायदा आणण्यात आला असताना मोहन भागवत यांनी हे वक्तव्य केले आहे.
हिंदू समाज संघटित करणे हाच आरएसएसचा मुख्य हेतू
हिंदू समाज संघटित करणे हाच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा मुख्य हेतू आहे. पण जेव्हा आम्ही RSS चे कार्यक्रम आयोजित करतो तेव्हा आम्हाला फक्त पुरुषच दिसतात. जर संपूर्ण समाज संघटित करायचा असेल तर यामध्ये ५० टक्के महिला असल्या पाहिजेत, असे सांगत हिंदू कुटुंबांनी भाषा, भोजन, भजन, भ्रमण, भूषा आणि भवन या गोष्टींच्या माध्यमातून आपल्या मातीशी असलेली नाळ कायम ठेवली पाहिजे. आपली मूळे अधिक घट्ट केली पाहिजेत, असा सल्ला मोहन भागवत यांनी यावेळी बोलताना दिला.
काय पाहायला हवे आणि काय नको हे शिकवण्याची गरज
ओटीटी प्लॅटफॉर्मवर सर्व काही पहायला मिळते. माध्यमांमध्ये जे येतेय, ते मुलांसाठी आणि आपल्या मूल्यांच्या व्यवस्थेसाठी काय चांगले होईल या दृष्टीकोनातून नसते. आपणच मुलांना घरात काय पाहायला हवे आणि काय नको हे शिकवण्याची गरज आहे, असे नमूद करत लोकांना आपले गुलाम बनवण्यासाठी पाश्चिमात्य देशांनी चीनमध्ये ओपियम पाठवले. तरुण त्याच्या आहारी गेले आणि पाश्चिमात्य देशांनी चीनवर राज्य केले. आपल्या देशातही हेच सुरू आहे. जेव्हा तुम्ही ड्रग्ज प्रकरण पाहता आणि ते कुठून येतात हे पाहिलेत तर ते का, कशासाठी येत आहेत आणि याचा कोणाला फायदा होत आहे हे तुम्हाला समजेल, असे मोहन भागवत यांनी सांगितले.