'कटुता संपवून पुढे जाण्याची वेळ, अयोध्या...', RSS प्रमुख मोहन भागवतांचे देशवासियांना आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2024 03:07 PM2024-01-21T15:07:15+5:302024-01-21T15:07:56+5:30
RSS Chief Mohan Bhagwat: 'भारताचा गेल्या दीड हजार वर्षांचा इतिहास संघर्षांनी भरलेला आहे. अयोध्येची पुनर्बांधणी देशाची आजची गरज.'
Ram Mandir: अयोध्येत उभारलेल्या भव्य श्रीराम मंदिराचा (Ram Mandir) उद्घाटन सोहला उद्या, म्हणजेच 22 जानेवारी रोजी होणार आहे. तत्पूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी देशातील जनतेला एक महत्वाचे आवाहन केले आहे. सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्षांमध्ये निर्माण झालेला अनावश्यक वाद संपवला पाहिजे. समाजांमध्ये निर्माण झालेली कटुता संपवण्याची वेळ आली आहे. अयोध्या (Ayodhya) संघर्षमुक्त ठिकाण म्हणून ओळखले जावे असे त्यांनी म्हटले आहे.
भारताचा इतिहास संघर्षांनी भरलेला
एका लेखात आरएसएस प्रमुख म्हणाले, 'भारताचा गेल्या दीड हजार वर्षांचा इतिहास संघर्षांनी भरलेला आहे. लुटीसाठी भारतावर अनेक हल्ले झाले, पण इस्लामच्या नावावर पाश्चिमात्यांकडून होणार्या हल्ल्यांमुळे समाजाचा संपूर्ण विनाश आणि अलिप्तता आली. देश आणि समाजाचे मनोधैर्य खचण्यासाठी धार्मिक स्थळे नष्ट करणे आवश्यक होते, म्हणून परकीय आक्रमकांनी भारतातील हजारो मंदिरे नष्ट केली.'
परकीयांचे मंदिरांवरील हल्ले...
'अयोध्येतील श्रीराम मंदिरावरील हल्ला याच उद्देशाने करण्यात आला होता. भारतावर हल्ला झाला तरी तेथील राज्यकर्त्यांनी कधीही परकीय भूमीवर आक्रमण केले नाही. मंदिरांवरील हल्ल्यांनंतरही भारतातील समाजाची श्रद्धा, निष्ठा आणि मनोधैर्य कधीच कमी झाले नाही. प्रतिकार संघर्ष सुरूच होता. या कारणास्तव श्रीराम जन्मभूमी पुन्हा-पुन्हा ताब्यात घेऊन तेथे मंदिर उभारण्याचे सातत्याने प्रयत्न सुरू झाले आणि मंदिराचा मुद्दा हिंदूंच्या मनात कायम राहिला.'
समाजातील कटुता संपली पाहिजे
'धार्मिक दृष्टिकोनातून श्रीराम हे बहुसंख्य समाजाचे पूजनीय देव आहेत आणि श्री रामचंद्रांचे जीवन संपूर्ण समाजाने स्वीकारले आहे. त्यामुळे आता विनाकारण निर्माण झालेला वाद आणि कटुता संपली पाहिजे. हा वाद पूर्णपणे संपावा, हे समाजातील प्रबुद्ध लोकांनी पहावे. अयोध्या म्हणजे, जेथे युद्ध नाही, विवादमुक्त ठिकाण, असे शहर ते आहे. त्यामुळे अयोध्येची पुनर्बांधणी ही संपूर्ण देशाची आजची गरज आहे आणि ते आपल्या सर्वांचे कर्तव्यही आहे,' अशा भावना मोहन भागवत यांनी व्यक्त केल्या आहेत.