नेहरुंनी प्रजासत्ताक दिनाच्या संचलनासाठी स्वयंसेवकांना आमंत्रित केलं होतं- संघ
By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2018 02:00 PM2018-05-30T14:00:52+5:302018-05-30T14:00:52+5:30
प्रणव मुखर्जींवरुन निर्माण झालेल्या वादावर संघाचं भाष्य
नवी दिल्ली: माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमात सहभागी होऊन स्वयंसेवकांना संबोधित करणार आहेत. याबद्दल काँग्रेसमध्ये मोठी नाराजी आहे. मुखर्जींनी या कार्यक्रमाचं निमंत्रण का स्विकारलं, अशी जोरदार चर्चा सुरू असताना आता त्यात पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरुंचीही एन्ट्री झालीय. नेहरुंनी 1963 मध्ये संघाच्या 3 हजार स्वयंसेवकांना प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात सहभागी होण्याचं आमंत्रण दिलं होतं, असं संघानं म्हटलंय. नेहरु संघाच्या सामाजिक कार्यामुळे प्रभावित झाले होते, असं संघाच्या नॅशनल मीडिया टीमचे सदस्य रतन शारदा यांनी म्हटलंय.
1962 च्या युद्धावेळी संघाच्या कार्यकर्त्यांनी सीमेवर खूप काम केलं होतं, असं रतन शारदा म्हणाले. 'स्वयंसेवकांनी केलेल्या कामामुळे नेहरु खूप प्रभावित झाले होते. त्यामुळे 1963 च्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात त्यांनी संचलनासाठी संघाच्या स्वयंसेवकांना आमंत्रित केलं होतं. त्यांनी आणखी काही स्वयंसेवी आणि सामाजिक संस्थांनादेखील संचलनासाठी आमंत्रित केलं होतं. मात्र चीनविरुद्धच्या युद्धातील नेहरुंच्या भूमिकेवर अनेकजण नाराज होते. त्यामुळे त्यांनी संचलनात सहभागी होण्याचा निर्णय घेतला,' असं शारदा यांनी सांगितलं.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात सहभागी घेतला होता, असं शारदा म्हणाले. 'आम्हाला संचलनाच्या काही आठवड्यांपूर्वीच आमंत्रण देण्यात आलं. मात्र आम्ही संचलनात सहभागी झालो,' असं शारदा म्हणाले. संघ मुख्यालयात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला प्रणव मुखर्जी उपस्थित राहणार आहेत. त्यावरुन त्यांच्यावर टीका होतेय. यावरही शारदा यांनी भाष्य केलं. मुखर्जींवरील टीका अनाठायी असल्याचं त्यांनी म्हटलंय.