“पाकिस्तान काश्मीरशिवाय पूर्ण होत नसेल तर भारत लाहोर आणि कराचीविना अपूर्ण”
By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2021 09:55 AM2021-12-06T09:55:13+5:302021-12-06T09:56:08+5:30
पंतप्रधान मोदींनी राजकारणामुळे संपुष्टात चाललेल्या माणुसकीला नवसंजीवनी देण्याचे काम केले आहे, असे कौतुकोद्गार काढण्यात आले आहेत.
नवी दिल्ली:पाकिस्तानकडूनजम्मू-काश्मीर प्रश्नी काही ना काही कुरापती सुरूच असतात. जम्मू-काश्मीरचा मुद्दा उकरून काढण्याची एकही संधी पाकिस्तान सोडत नाही. यातच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) कार्यकारिणी सदस्य इंद्रेश कुमार (Indresh Kumar) यांनी पाकिस्तानला जशास तसे उत्तर दिले आहे. पाकिस्तानवाले जर म्हणत असतील की, जम्मू-काश्मीरशिवाय पाकिस्तान अपूर्ण आहे. तर, आता आम्ही सांगतो की, कराची आणि लाहौरविना भारत अपूर्ण आहे.
भाजप कार्यालयात आयोजित एका कार्यक्रमात बोलताना इंद्रेश कुमार यांनी चीन आणि पाकिस्तानच्या भारतविरोधी धोरणावर टीका करत निषेध केला. तसेच चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकावा, याचा पुनरुच्चारही इंद्रेश कुमार यांनी केला. तसेच भारतातील दिव्यांग व्यक्तींनी तयार केलेल्या वस्तू खरेदी करण्याचा सल्ला दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी राजकारणामुळे संपुष्टात चाललेल्या माणुसकीला नवसंजीवनी देण्याचे काम केले आहे, असेही इंद्रेश कुमार यांनी यावेळी नमूद केले.
तर मग भारत लाहोर-कराचीशिवाय अपूर्ण
पाकिस्तान जर म्हणत असेल की काश्मीरशिवाय तो अपूर्ण आहे. तर मग लाहोर आणि कराचीशिवाय भारत अपूर्ण आहे, असे आता म्हणायला हवे, असे इंद्रेश कुमार यांनी म्हटले आहे. तसेच पंतप्रधान मोदी यांनी दिलेला दिव्यांग हा शब्द जगभरात वापरात यायला हवा, अशी आशाही इंद्रेश कुमार यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली.
दरम्यान, यापूर्वी वाराणसी येथे बोलताना, मोहम्मद अली जिना ज्यांना महापुरुष वाटतात, त्यांनी तातडीने देश सोडावा. भारत आणि भारतीयांवर ओझे होऊन उगाचच येथे राहू नये. जिनाप्रेमी लोकांनी तत्काळ भारत सोडला तरी चालेल, अशी टीका इंद्रेश कुमार यांनी केली होती. दुसऱ्यांना चुकीचे सिद्ध करण्यासाठी निराधार आरोप करणे किंवा दावे करणे चुकीचे आहे, असेही इंद्रेश कुमार यांनी म्हटले आहे. अखिलेश यादव यांनी एका सभेत मोहम्मद अली जिना यांच्याबाबत केलेल्या विधानामुळे वाद झाला होता.