“ज्यांना मोहम्मद अली जिना महापुरुष वाटतात, त्यांनी देश सोडून निघून जावे”: इंद्रेश कुमार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2021 10:50 PM2021-11-10T22:50:42+5:302021-11-10T22:50:57+5:30
जिनाप्रेमी लोकांनी तत्काळ भारत सोडला तरी चालेल, असे इंद्रेश कुमार यांनी म्हटले आहे.
वाराणसी: मोहम्मद अली जिना ज्या लोकांसाठी महापुरुष आहेत, त्यांनी तत्काळ देश सोडून निघून जावे, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वरिष्ठ प्रचारक इंद्रेश कुमार यांनी म्हटले आहे. काशी विद्यापीठाच्या ललित कला विभागाच्या एका कार्यक्रमाला इंद्रेश कुमार यांनी उपस्थिती लावली. त्यावेळी ते बोलत होते.
मोहम्मद अली जिना ज्यांना महापुरुष वाटतात, त्यांनी तातडीने देश सोडावा. भारत आणि भारतीयांवर ओझे होऊन उगाचच येथे राहू नये. जिनाप्रेमी लोकांनी तत्काळ भारत सोडला तरी चालेल, असे इंद्रेश कुमार यांनी म्हटले आहे. दुसऱ्यांना चुकीचे सिद्ध करण्यासाठी निराधार आरोप करणे किंवा दावे करणे चुकीचे आहे, असेही इंद्रेश कुमार यांनी म्हटले आहे.
बीएचयूच्या अंतरात्म्यात मालवीयच
बनारस हिंदू विश्वविद्यापीठाच्या अंतरात्म्यात महामना मालवीय आहेत. त्यांची जागा कुणीही घेऊ शकत नाही, असे इंद्रेश कुमार यांनी मालवीय यांचा फोटो हटवून अल्लामा इकबाल यांचा लावल्याप्रकरणावर प्रतिक्रिया देताना सांगितले. तसेच ‘सारे जहां से अच्छा’ गीत लिहिणार इकबाल पाकिस्तानात गेले, तेव्हा त्यांना या गीताचा अर्थ समजला नाही का, अशी टीकाही इंद्रेश कुमार यांनी केली.
...तर देशाची फाळणी झाली नसती
अखिलेश यादव यांनी एका सभेत मोहम्मद अली जिना यांच्याबाबत केलेल्या विधानामुळे वाद झाला होता. त्याबाबत त्यांचे सहकारी पक्षाचे प्रमुख ओमप्रकाश राजभर यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, जर जिना यांना देशाचे पहिले पंतप्रधान बनवले असते तर देशाची फाळणी झाली नसती. अटल बिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी यांनीही जिनांचे कौतुक केले होते, त्यामुळे त्यांचेही विचार वाचा, असा सल्ला राजभर दिला.
दरम्यान, जिनांशिवाय तुम्ही महागाईवर प्रश्न का विचारत नाही. हे सर्व काही भाजपामुळे होत आहे. भारतीय जनता पक्षामधून हिंदू-मुस्लिम आणि भारत-पाकिस्तान हटवा, म्हणजे यांची बोलती बंद होईल, अशी टीका राजभर यांनी केली. राजभर यांच्या पक्षाने अखिलेश यादव यांच्या पक्षासोबत आघाडी करण्याची घोषणा केली आहे. आगामी निवडणुकीत दोन्ही पक्ष एकत्र येऊन लढणार आहेत.