“अखंड भारताची संकल्पना समजून घ्यायला हवी”; RSS चे इंद्रेश कुमार स्पष्टच बोलले
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2022 07:08 PM2022-04-20T19:08:37+5:302022-04-20T19:10:55+5:30
देश सर्वांचा असून, धर्मावरून सुरू असलेले राजकारण चुकीचे आहे, असे इंद्रेश कुमार यांनी म्हटले आहे.
नवी दिल्ली: देश सर्वांचा आहे. धर्मावरून सुरू असलेले राजकारण चुकीचे असून प्रत्येकाने एकमेकांच्या धर्माचा आदर केला पाहिजे. धार्मिक स्वातंत्र्य अबाधित ठेवून धार्मिक अभिव्यक्तीसाठी देशभरात एक नियमावली करायला हवी, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वरिष्ठ प्रचारक इंद्रेश कुमार यांनी केले आहे.
पत्रकारांशी संवाद साधताना इंद्रेश कुमार म्हणाले की, सामाजिक ऐक्य जपण्यासाठी प्रत्येकाने एकत्र येऊन सण-उत्सव साजरे करायला हवेत. प्रत्येकाने घटनेच्या अधीन राहून नियमांचे पालन करावे. त्यामुळे सामाजिक स्वास्थही जपले जाईल. अखंड भारत संकल्पना समजून घ्यायला हवी. ज्याप्रमाणे युरोप खंडातील सर्व राष्ट्रांनी एकत्र येऊन ध्येयधोरणे ठरविली. त्याप्रमाणे भारतीय उपखंडातील सर्व राष्ट्रांनी एकत्र यायला हवे. एकमेकांचे अखंडत्व जपून काम करणे गरजेचे आहे, असे इंद्रेश कुमार यांनी नमूद केले आहे.
विविधेतील एकता जपून प्रत्येकाने धर्माचा आदर करायला हवा
गुन्हेगारांना धर्म नसतो. धर्माच्या नावाखाली केले जाणारे राजकारण बंद करायला हवे. मतांसाठी समुदायांचे तुष्टीकरणाचे कामही थांबविले पाहिजे. आपल्या देशातील विविधता हे बलस्थान आहे. विविधेतील एकता जपून प्रत्येकाने धर्माचा आदर करायला हवा, असे सांगत, धर्माच्या नावावर राजकारण केले जात असून प्रक्षोभक विधानांमुळे तेढ निर्माण केली जात आहे. राजकीय हेतूने अशा प्रकारची विधाने केली जातात. दोन समाजात तेढ निर्माण करण्याचे काम केले जाते. देशातंर्गत तसेच बाह्य शक्ती तेढ निर्माण करत आहेत, असे इंद्रेश कुमार म्हणाले.
दरम्यान, प्रत्येकाला आपले रितीरिवाज जपण्याचे अधिकार आहेत. एकमेकांच्या धर्माचा आदर करायला हवा. धार्मिक अस्मिता जरुर जपाव्यात. जाणीवपूर्वक प्रक्षोभक विधाने करून तेढ निर्माण करणे चुकीचे आहे. धार्मिक रितीरिवाज, परंपरा, अभिव्यक्तींसाठी देशपातळीवर नियमावली करायला हवी. त्यामुळे दोन समाजात तेढ निर्माण करण्याचे प्रकारांना आळा बसेल आणि सामाजिक ऐक्यही अबाधित राहील, असे इंद्रेश कुमार यांनी सांगितले.