'RSS कायम आरक्षणाच्या बाजूने, काही लोक खोटं पसरवत आहेत', मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2024 02:35 PM2024-04-28T14:35:24+5:302024-04-28T14:36:16+5:30
Mohan Bhagwat On Reservation: विरोधक सातत्याने BJP आणि RSS वर आरक्षणाच्या मुद्द्यावरुन टीका करत आहेत. अशातच मोहन भागवत यांचे महत्वाचे वक्तव्य समोर आले आहे.
RSS Chief On Reservation : लोकसभा निवडणुकीमुळे देशभरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. एकीकडे भाजप तिसऱ्यांदा सत्तेत परतण्यासाठी प्रयत्न करत आहे, तर दुसरीकडे INDIA आघाडी सातत्याने भाजप आणि RSS वर संविधानाचा मुद्दा उपस्थित करत आरोप करत आहेत. अशातच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी रविवारी (28 एप्रिल) आरक्षणाबाबत मोठे वक्तव्य केले.
#WATCH | Hyderabad, Telangana: RSS chief Mohan Bhagwat says, "A video is being circulated that RSS is against reservation and we cannot speak about this outside. Now this is completely false. The Sangh has been supporting all reservations as per the Constitution since the… https://t.co/lGju5pukHjpic.twitter.com/crS5FORdv1
— ANI (@ANI) April 28, 2024
हैदराबादमधील एका शैक्षणिक संस्थेतील कार्यक्रमाला संबोधित करताना भागवत म्हणाले, 'संघ परिवाराने काही गटांना दिलेल्या आरक्षणाला कधीच विरोध केला नाही. आरक्षण आवश्यक असेल तोपर्यंत वाढवावे, असे संघाचे मत आहे. संघ सुरुवातीपासूनच संविधानानुसार सर्व आरक्षणांना पाठिंबा देत आहे. काही लोक खोटे व्हिडिओ प्रसारित करुन संघाला बदनाम करण्याचा प्रयत्न करातत. आरएसएस आरक्षणाच्या विरोधात आहे आणि आम्ही त्याबद्दल बोलत नाही, असा व्हिडिओ प्रसारित केला जातोय. हे पूर्णपणे खोटं आहे. संघ संविधानानुसार सर्व आरक्षणांना पाठिंबा देते,' अशी प्रतिक्रिया भागवत यांनी दिली.
दरम्यान, लोलकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक पक्षांचे नेते भाजप आणि आरएएसवर आरक्षण संपवणार असल्याचा आरोप करत आहेत. आरक्षणावरून भाजप आणि काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या शाब्दिक युद्धादरम्यान मोहन भागवत यांचे हे वक्तव्य महत्वाचे आहे.भागवत यांनी गेल्या वर्षीही नागपुरात बोलताना आरक्षणावर भाष्य केले होते. जोपर्यंत समाजात भेदभाव आहे, तोपर्यंत आरक्षण चालूच राहिले पाहिजे, असे ते म्हणाले होते.
जोपर्यंत मोदी सरकार आहे तोपर्यंत आरक्षण संपणार नाही
दरम्यान, गृहमंत्री अमित शहा यांनीदेखील आरक्षणाच्या मुद्द्यावरुन काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला. 'राहुल गांधी लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत. भाजपला आरक्षण संपवायचे असते तर ते कधीच केले असते. काँग्रेस पक्षाने नेहमीच ओबीसी, एससी आणि एसटीच्या आरक्षणावर हल्ला केला आहे. आजही जामिया आणि अलीगढ विद्यापीठात एससी-एसटी आणि ओबीसी आरक्षण नाही. जोपर्यंत मोदी सरकार आहे तोपर्यंत एससी-एसटी आणि ओबीसी आरक्षणावर काहीही होणार नाही', असे आश्वासन शहा यांनी दिले.