ममता सरकारला दणका; मोहन भागवत यांच्या बंगालमधील सभेला उच्च न्यायालयाची परवानगी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2025 16:35 IST2025-02-14T16:34:58+5:302025-02-14T16:35:40+5:30
RSS Kolkata Rally: पश्चिम बंगाल पोलिसांनी RSS च्या सभेला परवानगी नाकारली होती.

ममता सरकारला दणका; मोहन भागवत यांच्या बंगालमधील सभेला उच्च न्यायालयाची परवानगी
RSS Kolkata Rally: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला कोलकाता उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. संघाला पश्चिम बंगालमधील वर्धमान येथे रॅली काढण्याची न्यायालयाकडून परवानगी मिळाली आहे. 16 फेब्रुवारी 2025 रोजी आरएसएसची रॅली होणार आहे. यापूर्वी पश्चिम बंगाल पोलिसांनी या रॅलीला परवानगी नाकारली होती. पण, आता या रॅलीसाठी परवानगी मिळली असून, हा मुख्यमंत्री ममता बॅनर्जींना मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे.
पीटीआय यावृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, कोलकाता उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी बंगाल सरकारचा आक्षेप फेटाळून लावत आरएसएसच्या रॅलीला सशर्त परवानगी दिली आहे. या रॅलीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत देखील उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
रॅलीला कमी आवाजात परवानगी
बंगाल पोलिसांनी असे सांगून परवानगी नाकारली होती की, सध्या बंगाल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन (WBBSE) द्वारे घेण्यात येणारी दहावीची परीक्षा सुरू आहे आणि त्यामुळे लाऊडस्पीकरच्या वापरावर बंदी आहे. पण, रॅली शांततेत काढण्यात यावी आणि आवाज कमी ठेवावा, असे कोलकाता उच्च न्यायालयाने म्हटले आहे.
अशी आहे रॅलीची रुपरेषा
आरएसएसची रॅली रविवारी होणार असून हा कार्यक्रम फक्त 1 तास 15 मिनिटे चालणार आहे, त्यामुळे कोणाचीही गैरसोय होईल असे न्यायालयाला वाटत नाही, असे न्यायाधीशांनी सांगितले. रॅली शांततेत पार पाडून आवाज कमी ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले. येथील रॅलीनंतर मोहन भागवत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रादेशिक नेते, स्थानिक कार्यकर्ते आणि वर्धमान आणि आसपासच्या भागातील प्रमुख लोकांचीही भेट घेणार आहेत.
वृत्तसंस्था आयएएनएसनुसार, आरएसएसचे सरचिटणीस जिष्णू बसू म्हणाले की, मोहन भागवत यांच्या दौऱ्याचा उद्देश हिंदू समुदायामध्ये राष्ट्रवादाची भावना वाढवणे, स्वदेशी चेतनेला प्रोत्साहन देणे आणि स्वावलंबी भारताची संकल्पना पुढे नेणे हा आहे.