'भारतीय लष्कर कोणत्याही क्षणी लाहोरमध्ये घुसू शकतं'
By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2018 05:42 PM2018-07-01T17:42:27+5:302018-07-01T17:45:11+5:30
'भाजपा जम्मू-काश्मीरमध्ये सत्ते असताना 300 दहशतवाद्यांचा खात्मा'
नागपूर: भारतीय लष्कर कोणत्याही क्षणी लाहोरमध्ये घुसू शकतं, हा संदेश सर्जिकल स्ट्राईकनं पाकिस्तानला दिला, असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते इंद्रेश कुमार यांनी म्हटलं. देशाची सद्यस्थिती या विषयावर आधारित व्याख्यान मालिकेत कुमार बोलत होते. जम्मू-काश्मीरमध्ये पीडीपी आणि भाजपाचं सरकार असताना 300 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला, असंही इंद्रेश कुमार म्हणाले.
जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी कारवाया रोखण्यात भाजपा सरकारनं महत्त्वाची भूमिका बजावली, असं कुमार नागपुरात आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यान मालिकेत म्हणाले. 'जम्मू-काश्मीरमधील सरकारमध्ये असताना आम्ही 3-4 महत्त्वपूर्ण कामं केली. जेव्हा ही कामं पूर्णत्वास गेली, तेव्हा आम्ही सरकारमधून बाहेर पडलो. आम्ही सत्तेचा त्याग केला,' असं त्यांनी सांगितलं. 'जम्मू-काश्मीरमध्ये सत्तेत असताना आम्ही दहशतवाद्यांविरोधात अभियान राबवलं. यामध्ये 250 ते 300 दहशतवादी मारले गेले. पोलीस, लष्कर, एनआयए आणि गुप्तचर विभागाच्या मदतीनं दहशतवाद्यांविरोधात धडक कारवाया करण्यात आल्या,' असं इंद्रेश कुमार यांनी म्हटलं.
भारतीय लष्करानं केलेला सर्जिकल स्ट्राईक जम्मू-काश्मीरमधील सरकारच्या सहकार्याशिवाय शक्य नव्हता, असं कुमार म्हणाले. मात्र जम्मू-काश्मीरमधील सरकारबद्दल बोलताना त्यांनी पीडीपीचा उल्लेख टाळला. 'आम्ही सर्जिकल स्ट्राईक केला. भारतीय सैन्य कोणत्याही क्षणी लाहोरपर्यंत मुसंडी मारु शकतो, हा संदेश यातून पाकिस्तानला मिळाला,' असं इंद्रेश कुमार यांनी म्हटलं.