म्हैस आणि जर्सी गायीच्या दुधामुळं गुन्हेगारीत वाढ होतेय; रा. स्व. संघ प्रचारकाचा जावईशोध
By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2018 12:32 PM2018-02-05T12:32:48+5:302018-02-05T16:03:24+5:30
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एका वरिष्ठ नेत्यानं वादग्रस्त विधान केलं आहे. म्हैस आणि जर्सी गायीच्या दुधाच्या सेवनामुळं गुन्हेगारी प्रवृत्तीमध्ये वाढ होत असल्याचा जावईशोध लावला आहे.
नवी दिल्ली - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एका वरिष्ठ नेत्यानं वादग्रस्त विधान केलं आहे. म्हैस आणि जर्सी गायीच्या दुधाच्या सेवनामुळं गुन्हेगारी प्रवृत्तीमध्ये वाढ होत आहे. नवभारत टाइम्सच्या वृत्तानुसार आरएसएसचे वरिष्ठ प्रचारक शंकरलाल यांनी असा दावा केला आहे. भारतीय गायींच्या दुधामुळं सात्विक शक्ती मिळते. देशी गाईच्या पोटात चुकून विष जरी गेलं तरी ते विष गाईच्या दुध, गोमूत्र अथवा शेणामध्ये जात नाही. बायबल, कुराण यांच्यासह इतर धर्मग्रंथात गोमांस निषिद्ध मानलं गेलं आहे, असंही त्यांनी सांगितलं.
देशी गाईच्या दुधाचे सेवन केल्यामुळं गुन्हेगारी प्रवृत्ती कमी होतं असल्याचा दावाही त्यांनी केला. जर्सी गाईचं अथवा म्हशीचे दुध पिल्यानं रागाचं प्रमाण वाढतं आणि सहनशीलता संपते असे ते म्हणाले. पुढे बोलताना ते म्हणाले की, भारतीय गायींची चमडी पातळ आसते. त्यांना खांदा असतो. पाय सरळ व मजबूत, पोळ खूपच लोंबती आणि शिस्न मध्यम आकाराचे असते. तर जर्सी गाईंची चमडी ही जाडजूड असते.
देशी गाईद्वारे गुन्हेगारमुक्त भारत ही कल्पाना आमंलात आणली जात असल्याचे आरएसएस प्रचारक शंकरलाल यांनी सांगितले. ते म्हणाले की, गाय प्रदुषण कमी करण्यातही मोलाची भुमिका बजावते. एक ग्राम तुपाचा दिवा लावल्यानं 100 किलो ऑक्सिजनची निर्मिती होते. जर तुपाचा दिवा तुळशीसमोर लावल्याने ओझोन गॅसचीही निर्मिती होतं असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
एखादी व्यक्ती आजारी असल्यास त्यांच्या समोर तूपचा दिवा लावल्यास ऑक्सिजनची कमी भासत नाही, असाही दावा शंकरलाल यांनी केला. एक एकर शेती आणि एका देशी गाईच्या मदतीनं 50 हजारांचं एका महिन्यात घेता येऊ शकतं. याबाबतचं प्रशिक्षण लोकांना दिलं जात असल्याची माहिती यावेळी शंकरलाल यांनी दिली. 31 मार्च रोजी संघातर्फे गौ जप महायज्ञचे आयोजन करण्यात आलं आहे.