“गेल्या ७५ वर्षांत देशाने अपेक्षित प्रगती केली नाही, निवडलेला मार्ग योग्य नव्हता”: मोहन भागवत
By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2021 01:40 PM2021-11-22T13:40:03+5:302021-11-22T13:40:20+5:30
केवळ राजकीय हेतूने समाजसेवा करू नये, त्यात नि:स्वार्थीपणा हवा, असे मोहन भागवत यांनी म्हटले आहे.
नवी दिल्ली:राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी पुन्हा एका देशाच्या प्रगतीबाबत वक्तव्य केले आहे. गेल्या ७५ वर्षांत देशाने अपेक्षित प्रगती केलेली नाही. कारण आपण प्रगतीचा जो मार्ग निवडला तो योग्य नव्हता, असे प्रतिपादन मोहन भागवत यांनी केले आहे. दिल्लीत आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते.
भारतातील लोकांनी या भूमीला प्राचीन काळापासून आपली मातृभूमी मानली आहे. जर आपण असेच करत राहिलो आणि भाऊ-बहिणी म्हणून एकत्र काम केले तर भारताची प्रगती कोणीच रोखू शकत नाही. आपल्याकडे एक आदर्श आहे, जगाला शिक्षित करण्यासाठी, जिंकण्यासाठी नाही, असे मोहन भागवत यांनी म्हटले आहे.
निवडणुकीतील तिकिटासाठी समाजसेवा करू नये
केवळ निवडणुकीतील तिकिटासाठी समाजसेवा ही सेवा नाही, तर नि:स्वार्थीपणे सेवा करणे हीच खरी सेवा आहे, त्यामुळे केवळ राजकीय हेतूने सेवा करू नये, असेही ते म्हणाले. लोकांनी केवळ जय श्रीरामच म्हणू नये, तर प्रभू रामासारखे बनण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असे मोहन भागवत यांनी नमूद केले.
आपल्या संस्कृतीचे एक अंगभूत सामर्थ्य आहे
आपल्या संस्कृतीचे एक अंगभूत सामर्थ्य आहे. म्हणूनच आपण टिकून राहिलो आहोत. आपण ३ हजार किमी लांबीच्या प्रदेशात १३० कोटी लोकसंख्येचे राष्ट्र आहोत. प्राचीन ग्रीस आणि रोमच्या संस्कृती नष्ट झाल्या, पण भारतीय संस्कृती टिकून राहिली आहे, असेही मोहन भागवत यांनी सांगितले.
दरम्यान, आपल्याला कोणाचे धर्मांतर करायचे नाही, तर कसे जगायचे हे शिकवायचे आहे. आपण भारतभूमीत जन्मलो आहोत आणि आमचा पंथ कोणाचीही उपासना पद्धत न बदलता चांगला माणूस घडवू शकतो, अशी शिकवण आपल्याला संपूर्ण जगाला करून द्यायची आहे. भारताला विश्वगुरू बनवायचे असेल, तर सर्वांना सोबत घेऊन समन्वयाने पुढे जाण्याची गरज आहे. आपल्याला भारताला आणखी समृद्ध बनवायचे आहे, असे यापूर्वी एका कार्यक्रमात बोलताना मोहन भागवत म्हणाले होते.