“फाळणीवेळी भारतानं जे भोगलंय, ते कधी विसरता येणार नाही”: मोहन भागवत
By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2021 11:02 AM2021-11-26T11:02:58+5:302021-11-26T11:03:49+5:30
हिंदू समाजाने जगासाठी काहीतरी चांगली कामे करण्यासाठी सक्षम व्हायला हवे, असे मोहन भागवत यांनी म्हटले आहे.
नवी दिल्ली: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) गेल्या काही दिवसांपासून अनेक विषयांसंदर्भात आपल्या भूमिका स्पष्ट करताना पाहायला मिळत आहे. यानंतर त्यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोपही होताना दिसत आहेत. यातच आता मोहन भागवत यांनी देशाच्या फाळणीवरून पुन्हा एकदा एक वक्तव्य केले आहे. फाळणीवेळी भारताला जे भोगावे लागले आहे, भारताने जे सोसले आहे, ते कधी विसरता येणार नाही, असे मोहन भागवत यांनी म्हटले आहे.
नोएडा येथे कृष्णानंद सागर लिखित ‘विभाजनकालीन भारत के साक्षी’ या पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमावेळी मोहन भागवत यांनी फाळणीवेळच्या कटू स्मृतींना उजाळा दिला. आपण आपला इतिहास वाचायला हवा आणि सत्य स्वीकारायला हवे. हिंदू समाजाने जगासाठी काहीतरी चांगले करण्यासाठी सक्षम व्हायला हवे, असे मोहन भागवत यांनी नमूद केले.
काहीतरी चांगली कामे करण्यासाठी सक्षम व्हायला हवे
हिंदू समाजाने जगासाठी काहीतरी चांगली कामे करण्यासाठी सक्षम व्हायला हवे. भारताने फाळणीच्या काळात जे सोसले आहे, ते विसरता येणार नाही. ते केवळ तेव्हाच विसरता येईल जेव्हा पुन्हा सगळे पूर्वीसारखे होऊन फाळणी रद्द होईल. सर्वांना सोबत घेऊन चालणारी भारताची विचारधारा आहे. स्वतः बरोबर आणि बाकीचे सगळे चूक असे मानणारी ही विचारधारा नाही. मात्र, इस्लामिक आक्रमकांची मात्र विचारसरणी अशीच होती की, फक्त आपणच बरोबर बाकी सगळे चूक. ब्रिटीशांची विचारसरणीही तशीच होती. इतिहासात घडलेल्या वादाचे, लढाईचं मूळ हेच होते, असेही मोहन भागवत यांनी सांगितले.
एकदा फाळणी झाली, पण आता ती पुन्हा होणार नाही
या आक्रमकांनीच १८५७ च्या उठावानंतर हिंदू-मुस्लिमांच्यात फूट पाडली. हा २०२१ मधला भारत आहे, १९४७ मधला नाही. एकदा फाळणी झाली, पण आता ती पुन्हा होणार नाही, असेही भागवत म्हणाले. यापूर्वी एका कार्यक्रमात बोलताना, गेल्या ७५ वर्षांत देशाने अपेक्षित प्रगती केलेली नाही. कारण आपण प्रगतीचा जो मार्ग निवडला तो योग्य नव्हता. भारतातील लोकांनी या भूमीला प्राचीन काळापासून आपली मातृभूमी मानली आहे. भारताची प्रगती कोणीच रोखू शकत नाही, असे मोहन भागवत यांनी सांगितले होते.