गांधी हत्येमध्ये RSS दोषी नाही - राहुल गांधी
By admin | Published: August 24, 2016 04:01 PM2016-08-24T16:01:17+5:302016-08-24T16:09:26+5:30
महात्मा गांधी यांच्या हत्येला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जबाबदार असल्याच्या आपल्या आरोपावरुन काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी माघार घेतली आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २४ - राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या हत्येला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जबाबदार असल्याच्या आपल्या आरोपावरुन काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी माघार घेतली आहे. महात्मा गांधींच्या हत्येला संपूर्णपणे आरएसएस जबाबदार असल्याचे आपल्याला म्हणायचे नव्हते असे राहुल यांनी बुधवारी सर्वोच्च न्यायालयाला सांगितले.
राहुल आरएसएसवरील हत्येचा आरोप मागे घेणार असतील तर, आपण राहुल यांच्याविरोधातील अब्रु नुकसानीचा खटला मागे घेऊ असे याचिका दाखल करणा-या संघ कार्यकर्त्याने म्हटले आहे. महात्मा गांधींच्या हत्येसाठी राहुल यांनी आरएसएसवर एक संघटना म्हणून कधीही आरोप केलेला नाही असे कपिल सिब्बल यांनी न्यायालयाला सांगितले.
याप्रकरणी पुढील सुनावणी एक सप्टेंबरला होणार आहे. आरएसएस स्वयंसेवकाचे वकील यूआर ललित यांनी आपली बाजू मांडण्यासाठी न्यायालयाकडून वेळ मागून घेतला. लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्यावेळी मार्च २०१४ मध्ये भाषण करताना राहुल यांनी आरएसएसच्या लोकांनी गांधींची हत्या केली आणि आज ते त्यांच्याबद्दल बोलत आहेत. आरएसएसने सरदार पटेल आणि गांधीजींना विरोध केला होता असे वक्तव्य केले होते.
१९ जुलैला सर्वोच्च न्यायालयाने राहुल यांना आपल्या वक्तव्याबद्दल माफी मागा किंवा अब्रुनुकसानीच्या खटल्यासाठी तयार रहा असे म्हटले होते.