पंतप्रधान नरेंद्र मोदींवर गंभीर आरोप करणाऱ्या प्रवीण तोगडियांसह तिघांची संघ करणार हकालपट्टी?
By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2018 01:00 PM2018-01-20T13:00:44+5:302018-01-20T13:01:44+5:30
विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष प्रवीण तोगडिया यांनी भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारवर लावलेले गंभीर आरोपांची किमत चुकवावी लागणार असल्याचं दिसत आहे.
नवी दिल्ली - विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष प्रवीण तोगडिया यांनी भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारवर लावलेले गंभीर आरोपांची किमत चुकवावी लागणार असल्याचं दिसत आहे. तोगडिया यांनी केलेल्या गंभीर आरोपांनंतर आता राष्ट्रीय स्वयं सेवक संघानं त्यांना पदावरुन हटवण्याची योजना केल्याची माहिती समोर आली आहे. तोगडिया यांच्याशिवाय, आरएसएसनं भारतीय मजदूर संघाचे जनरल सेक्रेटरी विरजेश उपाध्याय आणि विहिंपचे अध्यक्ष राघव रेड्डी यांचीही पदावरून हकालपट्टी करण्याचा विचार सुरू असल्याचे समजते आहे.
'टाईम्स ऑफ इंडिया'च्या वृत्तानुसार, प्रवीण तोगडिया, विरजेश उपाध्याय आणि राघव रेड्डी हे तिघंही स्वतःचाच अजेंडा चालवत आहेत. यामुळे सरकारची मान खाली जात आहे. यावर संघानं नाराजी व्यक्त केली आहे. शिवाय विहिंप किंवा भारतीय मजदूर संघ या दोन्ही संघटनांचा संघ विचारांच्या प्रसारासाठी उपयोग होत नाहीय. मिळालेल्या माहितीनुसार, विश्व हिंदू परिषदेची कार्यकारी बैठक फेब्रुवारी अखेरपर्यंत आयोजित करण्यात येणार आहे. यावेळी राघव रेड्डी यांना हटवून नव्या अध्यक्षांची निवड केली जाणार आहे. केवळ रेड्डीच नाही तर प्रवीण तोगडिया आणि त्यांच्या इतर समर्थकांनाही पदावरून हटवण्याचा विचार संघाकडून सुरू आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित असलेल्या संघटनांनी सरकारसोबत कोणतेही मतभेद करू नयेत, असे संघाचे मत आहे. भाजपा सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विरोध करणा-या सर्वांना बाहेरचा रस्ता दाखवण्याचा निर्णय संघानं घेतला आहे.
पोलीस चकमकीत मला ठार मारण्याचा कट, विहिंपचे नेते प्रवीण तोगडिया यांचा खळबळजनक आरोप
काही काळासाठी सोमवारी ‘बेपत्ता’ झालेले विश्व हिंदू परिषदेचे नेते प्रवीण तोगडिया मंगळवारी थेट लोकांपुढे आले आणि पत्रकार परिषद घेतली. काही लोकांनी आपली मुस्कटदाबी करण्याचा व पोलीस चकमकीत आपल्याला ठार मारण्याचा कट रचल्याचा खळबळजनक आरोप त्यांंनी केला; परंतु कोणत्याही धमक्या व दडपणाला बळी न पडता आपण हिंदूंच्या व शेतकºयांच्या हितासाठी आवाज उठवतच राहू, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. हॉस्पिटलमधून सुटी मिळाल्यानंतर आपण राजस्थानच्या न्यायालयात हजर होऊ, असेही त्यांनी स्पष्ट केले.
या घटनाक्रमाबाबत अतिशय भावनिक होत बोलताना तोगडिया (६२) म्हणाले की, सोमवारी सकाळी मी पूजा करीत असताना मला एक निरोप मिळाला की, गुजरात पोलिसांसह राजस्थान पोलिसांचे एक पथक चकमकीत तुम्हाला मारण्यासाठी येत आहे. त्यानंतर मी विहिंपच्या एका कार्यकर्त्यासोबत आॅटोमध्ये शहरातील थलतेज भागात गेलो. राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे आणि गृहमंत्री गुलाबचंद कटारिया यांना मी फोन केला; पण पोलीस आपल्याला अटक करण्यासाठी येत असल्याच्या वृत्ताचा त्यांनी इन्कार केला. त्यामुळे अधिकच संशय निर्माण झाला. त्यानंतर मी माझा मोबाईल बंद केला. त्यानंतर मी एका विमानाने जयपूरला जाण्याचा आणि न्यायालयासमोर हजर राहण्याचा निर्णय घेतला. मी आॅटोरिक्षातून विमानतळावर जात असताना अचानक मला चक्कर आली आणि मी चालकाला सांगितले की, एखाद्या हॉस्पिटलमध्ये घेऊन चला. त्यानंतर मी बेशुद्ध झालो.
योग्यवेळी नावे जाहीर करू
प्रवीण तोगडिया म्हणाले की, हिंदूंसाठी मी आवाज उठवत आलो आहे. राममंदिर, गोरक्षेसाठी राष्ट्रीय कायदा, काश्मिरातील हिंदूंचे पुनर्वसन, शेतक-यांच्या शेतमालाला योग्य भाव द्यावा, या मागण्यांसाठी आवाज उठवत आहे; मात्र माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे.जे लोक यामागे आहेत त्यांची नावे योग्य वेळी जाहीर करील, असेही त्यांनी सांगितले.