RSS, भाजपा नेत्यांची बैठक, चीन मुद्द्यावर सरकारला मदत करणार संघ
By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2020 09:21 PM2020-06-29T21:21:30+5:302020-06-29T21:27:24+5:30
या बैठकीत सद्य स्थितीसंदर्भात देशात एकतेची भावना निर्माण करणे आणि कोणत्याही संकटाचा सामना करण्यासाठी लोकांना तयार करणे, यावर चर्चा झाल्याचे समजते.
नवी दिल्ली - एकिकडे कोरोनाचे संकट तर दुसरीकडे लडाखच्या सीमेवर चीनसोबत तणाव. अशा परिस्थितीत आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित संघटना भाजपासोबत समाजात जाऊन जनजागृती आणि एक्याची भावना अधिक धृड करण्यासाठी काम करणार आहेत. याच बरोबर त्या विरोधाकांकडून, विशेषतः काँग्रेसकडून सरकारवर केल्या जाणाऱ्या आरोपांनाही उत्तर देतील.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी भाजपा आणि संघाच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये कोरोनाबरोबरच चीन, नेपाळ आणि पाकिस्तानसह विविध मुद्द्यांवर बैठक झाली. यात, सद्य स्थितीसंदर्भात देशात एकतेची भावना निर्माण करणे आणि कोणत्याही संकटाचा सामना करण्यासाठी लोकांना तयार करणे, यावर चर्चा झाली.
कोरोनामुळे लोकांच्या समस्या मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत. तसेच रोजगारापासून ते अर्थव्यवस्थेपर्यंत सर्वच परिस्थिती बिघडली आहे. अशा स्थितीत देशाला मजबुतीने उभे करणे आवश्यक आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या बैठकीला भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा, महामंत्री बीएल संतोष आणि संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी, आदी उपस्थित होते.
भारत सरकार आंतरराष्ट्रीय स्तरावर चीनसंदर्भात मुत्सद्देगिरीने प्रयत्न करत आहे. देशांतर्गत परिस्थितीसाठीही भाजपा पूर्णपणे सक्रिय झाली आहे. यात संघदेखील सहकार्य करत आहे. नेपाळसोबत नुकत्यात झालेल्या वादनंतर संघही सक्रिय झाला आहे. तसेच तेथील लोक आणि संघटनांसोबत चर्चा करून दोन्ही देशांचे संबंध पूर्वीप्रमाणे धृड करण्याचा प्रयत्न करत आहेत.