पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांच्या दर्जाची सुरक्षा, अखेर सरसंघचालक मोहन भागवत यांना कुणापासून धोका?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2024 10:59 AM2024-08-28T10:59:33+5:302024-08-28T11:02:59+5:30
केंद्रीय गृह मंत्रालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहन भागवत यांची सुरक्षा झेड प्लसवरून वाढवून अॅडव्हान्स सिक्योरिटी लायजन (ASL) करण्यात आली आहे.
राष्ट्रीय स्वयं सेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांची सुरक्षा वाढवण्यात आली असून त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांच्या दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. केंद्रीय गृह मंत्रालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहन भागवत यांची सुरक्षा झेड प्लसवरून वाढवून अॅडव्हान्स सिक्योरिटी लायजन (ASL) करण्यात आली आहे. जी पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांना आहे.
का वाढवण्यात आली सुरक्षा -
मोहन भागवत यांची सुरक्षा वाढवून, पीएम मोदी आणि अमित शाह यांच्या दर्जाची सुरक्षा दिल्यानंतर, अखेर त्यांना कुणापासून धोका आहे? असा प्रश्न उपस्थ होऊ लागला आहे. टीओआयने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, सरसंघचालक मोहन भागवत यांच्या सुरक्षेची समीक्षा केल्यानंतर, पंधरवड्यापूर्वीच सुरक्षा वाढविण्याला अंतिम रूप देण्यात आले. मोहन भागवत गैर-भाजप शासित राज्यांच्या दौऱ्यावर असताना त्यांच्या सुरक्षेत ढिलाई आढळून आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
अखेर मोहन भागवत यांना कुणापासून आहे धोका?
सरसंघचालक मोहन भागवत यांच्या झेड प्लस सुरक्षेत सीआयएसएफमधून डेप्युटेशनवर आलेल्या अधिकारी आणि सुरक्षारक्षकांचा समावेश होता. ही सुरक्षा अपग्रेड करून अॅडव्हान्सड सिक्योरिटी लायजन (ASL) करण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सरसंघचाल कट्टर इस्लामीक संघटनांसह अनेक संघटनांच्या निशाण्यावर आहेत.
सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनाही देण्यात आलीय माहिती -
मोहन भागवत यांच्यावरील वाढत्या धोक्यासंदर्भात विविध संस्थांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे केंद्रीय गृहमंत्रालयाने त्यांना 'एएसएल प्रोटेक्टेड पर्सन' श्रेणीत टाकले आहे. सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनाही या अपग्रेडसंदर्भात अधिकृत माहिती देण्यात आली आहे.