राम मंदिरामुळे भारत अधिक बलशाली होईल; RSS ला विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2021 12:58 PM2021-03-21T12:58:52+5:302021-03-21T13:00:50+5:30

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) प्रतिनिधी मंडळाची बैठक शनिवारी बेंगळुरू येथे आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत काही प्रस्ताव मंजूर करण्यात आले.

rss says ram mandir construction will make india more stronger | राम मंदिरामुळे भारत अधिक बलशाली होईल; RSS ला विश्वास

राम मंदिरामुळे भारत अधिक बलशाली होईल; RSS ला विश्वास

googlenewsNext
ठळक मुद्देराम माधव यांची संघात घरवापसी२०२४ च्या पार्श्वभूमीवर कार्यकारिणीत मोठे बदललव्ह जिहाद विरोधी कायद्याचे समर्थन

बेंगळुरू:राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) प्रतिनिधी मंडळाची बैठक शनिवारी बेंगळुरू येथे आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत काही प्रस्ताव मंजूर करण्यात आले. राम मंदिरासाठी देणगी गोळा करण्याच्या अभियानामुळे देश अजूनही श्रीरामांशी भावनिकदृष्ट्या जोडला गेला आहे. तसेच राम मंदिरामुळे भारत अधिक बलशाली होईल, असा विश्वास यावेळी बैठकीत व्यक्त करण्यात आला. (rss says ram mandir construction will make india more stronger)

सर्वोच्च न्यायालयाने राम मंदिराबाबत दिलेल्या ऐतिहासिक निर्णयानंतर श्रीराम जन्मभूमि तीर्थक्षेत्र स्थापन करण्यात आले. अयोध्यामध्ये भव्य राम मंदिर उभारणीसाठी देणगी गोळा करण्याचे देशव्यापी अभियान हाती घेण्यात आले. देशाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिण्यात आलेल्या या घटनेमुळे भविष्यातील पिढ्यांना प्रेरणा मिळत राहील. या अभियानात संघ पोहोचू शकला नाही, अशा ठिकाणी नागरिकांनी स्वतः बोलावून राम मंदिरासाठी देणग्या दिल्या. हा उत्साह ऐतिहासिक असाच म्हणावा लागेल, असे या बैठकीदरम्यान सांगण्यात आले.

व्यापक विचार, ६ भाषांचे जाणकार; 'अशी' आहे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांची कारकीर्द

कोरोना काळात भारताची एकजूट

सन २०२० मध्ये मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झालेल्या कोरोना विषाणू संसर्गाच्या संकटातही देशवासीयांची एकजूटता पाहायला मिळाली. एकत्रितपणे देश या संकटाशी सामना करण्यासाठी सज्ज झाला, असेही यावेळी नमूद करण्यात आले. तसेच धर्मांतरण आणि लव्ह जिहाद विरोधी कायद्याचे संघाकडून यावेळी समर्थन करण्यात आले. संघाचे नवीन सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे यांनी सांगितले की, बौद्धिक अभियानाच्या माध्यमातून यासंदर्भातील कायदा आणि विचार पोहोचवणे आवश्यक आहे. आम्ही लव्ह जिहाद या शब्दाचा वापर करत नाही. न्यायालयाकडून असे शब्द वापरले जातात. कोणत्याही चुकीच्या उद्देशाने मुलींना प्रलोभने देऊन त्यांच्याशी विवाह करणे आणि त्यानंतर धर्मांतरण करणे या प्रवृत्तीला विरोध व्हायला हवा, असेही ते म्हणाले. 

राम माधव यांची संघवापसी

संघाच्या या बैठकीदरम्यान कार्यकारिणीत मोठे बदल करण्यात आले. राम माधव यांना संघाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत सदस्य म्हणून नियुक्त करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. राम माधव यांना यापूर्वी संघातून भाजपमध्ये पाठवण्यात आले होते. भाजपमध्ये आल्यानंतर माधव यांच्याकडे महासचिव पदाची जबाबदारी देण्यात आली होती. मात्र, आता पुन्हा राम माधव यांना संघात परत बोलावण्यात आले आहे. सन २०२४ मध्ये संघाला १०० वर्षे पूर्ण होत आहेत. याचवर्षी लोकसभा निवडणूक आहे. या एकंदर पार्श्वभूमीवर संघात मोठे बदल करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

Web Title: rss says ram mandir construction will make india more stronger

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.