आता तो दिवस दूर नाही, काश्मिरी पंडित लवकरच आपल्या घरी परततील; सरसंघचालक भागवतांचं मोठं विधान
By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2022 03:21 PM2022-04-03T15:21:24+5:302022-04-03T15:22:31+5:30
भागवत म्हणाले, "मला वाटते, की तो दिवस अगदी जवळ आला आहे, जेव्हा काश्मिरी पंडित आपल्या घरी परत येतील आणि तो दिवस लवकर यावा, अशी माझी इच्छा आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत यांनी काश्मिरी पंडित लवकरच खोऱ्यात परततील, असे म्हटले आहे. 1990 च्या दशकात दहशतवाद सुरू झाल्यानंतर घरातून विस्थापित झालेले काश्मिरी पंडित लवकरच खोऱ्यात परततील, अशी आशा भागवत यांनी व्यक्त केली. भागवत यांनी जम्मूमधील नवरेह उत्सवाच्या शेवटच्या दिवशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे काश्मिरी हिंदू समुदायाला संबोधित केले.
भागवत म्हणाले, "मला वाटते, की तो दिवस अगदी जवळ आला आहे, जेव्हा काश्मिरी पंडित आपल्या घरी परत येतील आणि तो दिवस लवकर यावा, अशी माझी इच्छा आहे. विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित 'द काश्मीर फाइल्स'ने काश्मीरी पंडितांचे खरे चित्र आणि 1990 च्या दशकात काश्मीर खोऱ्यातून झालेल्या त्यांच्या पलायनाचा खुलासा केला आहे."
विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित, 'द कश्मीर फाइल्स' 11 मार्चरोजी चित्रपटगृहांत प्रदर्शित झाला होता. यात अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती, पल्लवी जोशी, दर्शन कुमार आणि इतरही काही अभिनेते आहेत. या चित्रपटाने देशात संपूर्ण राजकीय वातावरण ढवळून काढले आहे.
'कश्मीरी पंडितांनी आपल्या घरी परतण्याचा संकल्प करावा' -
"आज प्रत्येक भारतीयाला काश्मिरी पंडितांच्या पलायनाचे सत्य माहित आहे. आता काश्मिरी पंडितांना अशा प्रकारे त्यांच्या घरी जायचे आहे, की तेथून पुन्हा कधीही पलायनाची वेळ येणार नाही आणि यासाठी हीच खरी वेळ आहे." काश्मिरी पंडितांनी आपल्या घरी परतण्याचा संकल्प करायला हवा. जेणेकरून परिस्थिती लवकर बदलेले. असेही भागवत म्हणाले.
'द कश्मीर फाइल्सने लोकांचे मन हेलावले' -
भागवत म्हणाले, "काही लोक चित्रपटाच्या समर्थनार्थ आहेत, तर काही लोक याला अर्धसत्य म्हणत आहेत. मात्र, या चित्रपटाने कटू सत्य जगासमोर आणून लोकांच्या मनाला हादरा दिला आहे, असे देशातील सर्वसामान्य नागरिकांचे मत आहे. एवढेच नाही, तर कुणीही काश्मिरी पंडितांना जाण्यासाठी मजबूर करू शकत नाही. जर कुणी असे करण्याचा प्रयत्न केलाच, तर त्याला परिणाम भोगावे लागतील."