आरटीआय कार्यकर्त्याने राष्ट्रपतींकडे मागितली आत्महत्येची परवानगी
By admin | Published: March 7, 2016 12:04 PM2016-03-07T12:04:17+5:302016-03-07T12:17:39+5:30
आरटीआय कार्यकर्ते ब्रीजराज किशन यांनी राष्ट्रपतींकडे आत्महत्या करण्यासाठी परवानगी मागितली आहे
Next
ऑनलाइन लोकमत -
मेरठ, दि. ७ - आरटीआय कार्यकर्ते ब्रीजराज किशन यांनी राष्ट्रपतींकडे आत्महत्या करण्यासाठी परवानगी मागितली आहे.
आपल्याला जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्यामुळे आपण आत्महत्येची परवानगी मागितली असल्याचे ब्रीजराज यांनी सांगितलं. काही सरकारी अधिका-यांनी जमवलेल्या बेकायदेशीर मालमत्तेप्रकरणी ब्रीजराज यांनी आरटीआयद्वारे माहिती मागितली होती, त्याप्रकरणी त्यांनी जीवे मारण्याची धमकी येत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
हिंदुस्तान टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार 'कोणी गुन्हेगाराने माझा जीव घेण्यापेक्षा, मी माझा जीव देणं पसंत करेन', असं ब्रीजराज किशन यांचं म्हणणं आहे. ब्रीजराज किशन यांना दोन मुलं असून ते आपल्या आई-वडिलांसोबत राहतात. ब्रीजराज हे माहिची अधिकार (आरटीआय) कार्यकर्ते असून त्यांनी अनेक घोटाळे उघडकीस आणले आहेत. सरकारी कार्यालयांमध्ये विशेषत: मेरठ विकास प्राधिकरण, नगर निगम आणि आवास विकासमध्ये होणा-या घोटाळ्यांचा त्यांनी पर्दाफाश केला होता.
ब्रीजराज यांनी मेरठ विकास प्राधिकरणमधील ४० सरकारी अधिका-यांच्या बेनामी संपत्तीची माहिती मागवली होती. त्यानंतर त्यांना काही कंत्राटदार आणि बिल्डरांकडून धमक्या येऊ लागल्या. याप्रकरणी ब्रीजराज यांनी परतपूर पोलिसांकडे तक्रारदेखील केली मात्र पोलिसांनी त्याकडे कानाडोळा केल्याचा आरोप किशन यांनी केला आहे. अखेर ब्रीजराज यांनी राष्ट्रपतींकडे आत्महत्येची परवानगी मागणारे पत्र पाठवलं आहे.