RTI कॉपी व्हायरल, मोदींनी दत्तक घेतलेल्या 4 गावात 1 रुपयाही निधी खर्च नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2018 08:50 AM2018-07-20T08:50:21+5:302018-07-20T08:52:35+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांसद आदर्शग्राम योजनेत वाराणसी मंतदारसंघातील चार गावे दत्तक घेतली आहेत. मात्र, या चारपैकी एकाही गावात विकासाकामासाठी 1 रुपयांचाही खर्च करण्यात आला नाही.
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांसद आदर्शग्राम योजनेत वाराणसी मंतदारसंघातील चार गावे दत्तक घेतली आहेत. मात्र, या चारपैकी एकाही गावात विकासाकामासाठी 1 रुपयांचाही खर्च करण्यात आला नाही. जिल्हा ग्रामविकास प्राधिकरणाकडून माहिती अधिकाराअंतर्गत ही माहिती देण्यात आली आहे. प्राधिकरणाचे हे पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. यावरुन काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी 'विकास वेडा झाल्याचे' हेच खरे सत्य असल्याचे म्हटले आहे.
कन्नौज येथील रहिवासी अनुज वर्मा यांनी माहिती अधिकाराचा वापर करत, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दत्तक घेतलेल्या गावांबाबत माहिती मागवली होती. वर्मा यांच्या या विनंती अर्जाला जिल्हा ग्रामीण विकास प्राधिकरणाने 30 जून रोजी पत्र पाठवून माहिती दिली. मोदींनी वाराणसीतील जयापूर, नागेपूर, ककरहिया आणि डोमरी ही चार गावे दत्तक घेतली आहेत. मात्र, या चारही गावांमध्ये गेल्या 4 वर्षात एकही रुपया खर्च करण्यात आला नाही. विशेष म्हणजे या गावात झालेला विकास हा सरकारी योजना आणि कंपनींच्या सीएसआरमधून करण्यात आला आहे. तर काही संस्थांनीही मदत करुन गावच्या विकासात हातभार लावला आहे.
मोदीजी,
— Randeep Singh Surjewala (@rssurjewala) July 19, 2018
पगलाए ‘विकास’ का सच।
एक भी गोद लिए गाँव में आपने सांसद निधि से फूटी कौड़ी नहीं दी।
आपके द्वारा ही शुरू की गई ‘सांसद आदर्श ग्राम योजना’ भी बनी ‘जुमला योजना’। pic.twitter.com/PL7YG7U1xI
याप्रकरणी काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी ट्विट करुन पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली. 'आपण दत्तक घेतलेल्या एकाही गावात खासदार निधीतून 1 रुपयाही खर्च केला नाही. आपल्या संकल्पनेतून साकारलेली सांसद आदर्शग्राम योजना हाही एक जुमलाच' असल्याचे सुरजेवाला यांनी मोदींनी उद्देशून केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. तर काँग्रेस प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदी यांनीही ट्विट करुन मोदींवर हल्लाबोल केला. मोदी सरकार आरटीआयला विरोध का करते, हे आम्हाला चांगलच माहित आहे. पंतप्रधान मोदींबाबतचे काही वास्तव यातून बाहेर निघते, जसे की स्वत:च्या प्रचारासाठी 400 कोटींचा खर्च करणे. पण, वाराणसीत दत्तक घेतलेल्या गावांसाठी एक रुपयाही न खर्च करणे, अशा शब्दात चतुर्वेदी यांनी मोदींना ट्विट केले आहे.