UN मध्ये पाकिस्तानला फटकारणाऱ्या कोण आहेत रुचिरा कंबोज?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2022 01:17 PM2022-10-13T13:17:20+5:302022-10-13T13:18:00+5:30
Ruchira Kamboj : संयुक्त राष्ट्र महासभेच्या (UNGA) विशेष सत्रादरम्यान रुचिरा कंबोज यांनी काश्मीरचा मुद्दा उपस्थित केल्याबद्दल पाकिस्तानवर टीका केली.
नवी दिल्ली : संयुक्त राष्ट्रसंघातील (United Nations) भारताच्या स्थायी प्रतिनिधी रुचिरा कंबोज (Ruchira Kamboj) यांनी पुन्हा एकदा पाकिस्तानला (Pakistan) फटकारले आहे. संयुक्त राष्ट्र महासभेच्या (UNGA) विशेष सत्रादरम्यान रुचिरा कंबोज यांनी काश्मीरचा मुद्दा उपस्थित केल्याबद्दल पाकिस्तानवर टीका केली.
यावेळी रुचिरा कंबोज यांनी पुन्हा एकदा पाकिस्तानला काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे आणि राहणार असल्याचे स्पष्ट शब्दांत सांगितले. तसेच, पाकिस्तान संयुक्त राष्ट्रासारख्या मोठ्या व्यासपीठाचा गैरवापर करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. दरम्यान, रुचिरा कंबोज या 1987 च्या बॅचच्या भारतीय परराष्ट्र सेवा (IFS) अधिकारी आहेत. संयुक्त राष्ट्रातील भारताच्या त्या पहिल्या महिला राजदूत आहेत.
भारतीय परराष्ट्र सेवा अधिकारी रुचिरा कंबोज यांनी ऑगस्ट 2022 मध्ये संयुक्त राष्ट्रांमध्ये भारताच्या नवीन स्थायी प्रतिनिधी म्हणून पदभार स्वीकारला. संयुक्त राष्ट्रातील भारताच्या त्या पहिल्या महिला राजदूत आहेत. रुचिरा कंबोज 1987 च्या बॅचच्या IFS अधिकारी आहेत. यापूर्वी त्या भूतानमध्ये भारताच्या राजदूत होत्या. तसेच, त्यांनी दक्षिण आफ्रिकेत भारताचे उच्चायुक्त म्हणूनही काम केले आहे. याशिवाय, 2011 ते 2014 पर्यंत त्या भारताच्या चीफ ऑफ प्रोटोकॉल म्हणून कार्यरत होत्या.
अनेक जबाबदार पदांवर काम करण्याचा अनुभव
रुचिरा कंबोज यांची जून 2022 मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या (UN) मुख्यालयात भारताची स्थायी प्रतिनिधी (Permanent Representative to UN) म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यांनी राजदूत टीएस तिरुमूर्ती यांची जागा घेतली. रुचिरा कंबोज यांनी फ्रान्समध्ये थर्ड सेक्रेटरी म्हणून कारकीर्द सुरू केली होती. 1989 ते 1991 या काळात फ्रान्समधील भारतीय दूतावासात त्यांनी थर्ड सेक्रेटरी म्हणून जबाबदारी सांभाळली होती. याचबरोर, 1991 ते 1996 पर्यंत रुचिरा कंबोज यांनी परराष्ट्र मंत्रालयाच्या युरोप पश्चिम विभागात अतिरिक्त सचिव (Upper Secretary) म्हणून काम केले. तसेच, 1987 च्या सिव्हिल सर्व्हिसेस बॅचच्या त्या अखिल भारतीय महिला टॉपर होत्या.