श्रद्धाच्या हत्येविरोधात आयोजित हिंदू एकता मंचच्या कार्यक्रमात हंगामा, महिलेनं एकाला चपलेनं मारलं!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2022 03:49 PM2022-11-29T15:49:21+5:302022-11-29T15:50:32+5:30
श्रद्धाच्या हत्येविरोधात हिंदू एकता मंचानं मंगळवारी महापंचायतचं आयोजन केलं होतं. पण या कार्यक्रमाच्या व्यासपीठावरच हाणामारीचा प्रसंग घडला.
नवी दिल्ली-
श्रद्धाच्या हत्येविरोधात हिंदू एकता मंचानं मंगळवारी महापंचायतचं आयोजन केलं होतं. पण या कार्यक्रमाच्या व्यासपीठावरच हाणामारीचा प्रसंग घडला. एका महिलेनं व्यासपीठावर उपस्थित व्यक्तीला चपलेनं मारलं. यावेळी व्यासपीठावर उपस्थित इतर व्यक्तींनी वाद सोडवण्याचा प्रयत्न केला.
दिल्लीच्या छतरपूर येथे श्रद्धाला न्याय मिळावा या मागणीसह हिंदू एकता मंचानं महापंचायतीचं आयोजन केलं होतं. ही पंचायत त्याच परिसरात होती जिथं आफताबनं श्रद्धाची हत्या केली होती. बेटी बचाओ फाऊंडेशननंही या महापंचायत सभेला आपलं समर्थन दिलं होतं.
महापंचायतच्या दरम्यान एक महिला आपली तक्रार सांगण्यासाठी व्यासपीठावर आली. पण एका व्यक्तीनं या महिलेला धक्का दिला आणि व्यासपीठावरुन खाली ढकलण्याचा प्रयत्न केला. यावरुन संतापलेल्या महिलेनं संबंधित व्यक्तीला चपलेनं मारण्यास सुरुवात केली. यावेळी व्यासपीठावर उपस्थितांनी वाद सोडवण्याचा प्रयत्न केला.
आफताबवर श्रद्धाच्या हत्येचा आरोप
आफताबनं श्रद्धा वालकर हिची १८ मे रोजी गळा दाबून हत्या केली. त्यानंतर तिचे ३५ तुकडे करुन ते जंगलात फेकून दिले. दोघंही ८ मे रोजी दिल्लीच्या महरौली परिसरात एका फ्लॅटमध्ये लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. याआधी ते दोघंही मुंबईत वास्तव्याला होते. १८ मे रोजी श्रद्धाचं आफताबसोबत भांडण झालं होतं. यानंतर वादाचं रुपांतर हाणामारीत झालं आणि आफताबनं श्रद्धाची हत्या केली. आफताबनं श्रद्धाच्या मृतदेहाचे ३५ तुकडे करुन ते फ्रीजमध्ये ठेवले होते. त्यानंतर दररोज रात्री एका पिशवीतून तो तुकडे जवळच्याच एका जंगलात टाकत होता. पोलिसांनी आफताबला १२ नोव्हेंबरला अटक केली आणि त्याची १ डिसेंबर रोजी नार्को टेस्ट होणार आहे.