सत्ताधारी भाजपाचे देशभरात उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2018 05:18 AM2018-04-13T05:18:20+5:302018-04-13T05:18:20+5:30
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधी पक्षांनी विशेषत: काँग्रेसने घातलेल्या गोंधळामुळे कामकाज होऊ न शकल्याच्या निषेधार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी व पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्यासह भाजपाचे खासदार, आमदार, नेते, कार्यकर्त्यांनी देशभर गुरुवारी उपोषण केले.
नवी दिल्ली : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधी पक्षांनी विशेषत: काँग्रेसने घातलेल्या गोंधळामुळे कामकाज होऊ न शकल्याच्या निषेधार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी व पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्यासह भाजपाचे खासदार, आमदार, नेते, कार्यकर्त्यांनी देशभर गुरुवारी उपोषण केले. भाजपाने केलेले उपोषण हास्यास्पद असल्याची टीका काँग्रेसने केली आहे.
नरेंद्र मोदी व गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी उपोषणाच्या दिवशी कामकाज केले. भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी कर्नाटकमध्ये तर प्रकाश जावडेकर, मुख्तार अब्बास नक्वी, पीयूष गोयल आदी भाजपा मंत्र्यांनी देशभरात विविध ठिकाणी उपोषण केले. या सर्वांनी काँग्रेसवर टीकेचा भडिमार केला.
>मुख्यमंत्र्यांचे
मुंबईत उपोषण
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विलेपार्ले येथील भाजपा कार्यालयात उपोषणात सहभागी झाले. खा. पूनम महाजन, खा. परेश रावल, मुंबई भाजपा अध्यक्ष आ. आशिष शेलार व आ. पराग अळवणी या वेळी उपस्थित होते. प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांनी औरंगाबाद येथे उपोषण केले.
>पुण्यात सॅन्डविच, वेफर्स खाऊन उपोषण!
पुण्यातील खडकवासला मतदारसंघाचे आमदार भीमराव तापकीर व मावळचे बाळा भेगडे यांनी सॅन्डविच व वेफर्स खाऊन उपोषण केल्याचा व्हिडीओ दुपारी सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे भाजपाच्या उपोषणाचा पुरता फज्जा उडाला. पालकमंत्री गिरीश बापट यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित जिल्हास्तरीय खरीप हंगाम व जलयुक्त शिवार योजनेच्या आढावा बैठकीत आमदार भीपराव तापकीर, बाळा भेगडे यांना उपोषणाचा विसर पडला. बैठकीत ब्रेड सँडविच, वेफर्स, बाकरवडी आणि काजू कतलीवरही त्यांनी ताव मारला.
सकाळी चहा-नाश्ता, दुपारनंतर उपोषण
भाजपाच्या खासदारांनी गुरुवारी आपापल्या मतदारसंघांत वा राज्यात उपोषण केले. महाराष्ट्राच्या महिला व बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे यांनी आपण दुपारनंतर उपोषण करणार असल्याचे सांगितले. त्या नाशिकमध्ये कार्यक्रमासाठी आल्या असताना, त्यांचा काही ठिकाणी चहा व नाश्ता झाला. त्यामुळे दुपारनंतर मी उपोषण करणार आहे, असे त्यांनी पत्रकारांना सांगितले.