‘सुल्तान’च्या सरावानंतर बलात्कार पीडितेसारखे वाटत होते - सलमान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2016 03:02 AM2016-06-22T03:02:57+5:302016-06-22T03:02:57+5:30
कुस्तीवर आधारित ‘सुल्तान’ या चित्रपटासाठी मला कठोर प्रशिक्षण घ्यावे लागले. या चित्रपटाचे चित्रीकरण थकवून टाकणारे असायचे. शूटिंग संपल्यानंतर एखाद्या बलात्कार झालेल्या महिलेसारखे वाटायचे
नवी दिल्ली : कुस्तीवर आधारित ‘सुल्तान’ या चित्रपटासाठी मला कठोर प्रशिक्षण घ्यावे लागले. या चित्रपटाचे चित्रीकरण थकवून टाकणारे असायचे. शूटिंग संपल्यानंतर एखाद्या बलात्कार झालेल्या महिलेसारखे वाटायचे, असे उद्गार अभिनेता सलमान खान याने काढले आहेत.
या विधानानंतर तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या असून, भाजपासह विविध पक्षांनी त्याने माफी मागावी यासाठी दबाव वाढविला आहे. मात्र आपल्या मुलाच्या या विधानाबद्दल सलमानचे वडील लेखक सलीम खान यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे.
सलमानने केलेले विधान बेफिकीर आणि बेजबाबदारपणाचे असून, त्याने जाहीर माफी मागतानाच या विधानाबाबत स्पष्टीकरण द्यावे, असे राष्ट्रीय महिला आयोगाच्या
प्रमुख ललिता कुमारमंगलम यांनी मंगळवारी स्पष्ट केले. आयोगाने त्याच्या वक्तव्याची स्वत:हून दखल घेत त्याला पत्र पाठविले आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
काय म्हणाला सलमान खान ?
आगामी सुल्तान चित्रपटात कुस्तीगीराची भूमिका बजावताना कसे वाटले, असा प्रश्न मुलाखतीच्यावेळी विचारला असता सलमान म्हणाला की, सुल्तान चित्रपटाच्या चित्रीकरणाच्यावेळी खूप परिश्रम घ्यावे लागत होते.
शूटिंग संपल्यानंतर खूप थकून जात होतो. एखाद्या बलात्कार पीडितेसारखे वाटायचे. मला १२० किलो वजनाच्या कुस्तीपटूला १० वेळा १० वेगवेगळ्या कोनांतून उचलावे लागायचे. त्याला अनेकदा उचलून जमिनीवर आदळतही होतो.
सरावानंतर माझ्यात त्राण उरत नव्हते. मला बलात्कार झालेल्या महिलेसारखे वाटायचे. मी चालूही शकत नव्हतो. मी जेवण केल्यानंतर थेट कुस्तीच्या सरावासाठी जायचो. प्रशिक्षण थांबवता येत नव्हते.
पिता सलीम खान यांनी मागितली माफी
विनोदाच्या अंगाने किंवा उदाहरण देण्याच्या उद्देशाने सलमान जे काही बोलला ते चुकीचे होते, यात कोणतीही शंका नाही. त्याचा या विधानामागचा उद्देश चुकीचा नव्हता, तथापि मी माझे कुटुंबीय, त्याचे चाहते आणि मित्रांच्यावतीने माफी मागतो. त्याला क्षमा करावी, असे सलमानचे वडील प्रसिद्ध पटकथा लेखक सलीम खान म्हणाले.
बलात्कार काय असतो हे सलमानला माहीत नाही. त्याची तुलना १२० किलो वजन उचलण्याशी करता येत नाही. त्याचे वक्तव्य दुर्दैवी असून घोर निंदनीय आहे. त्याचे चाहते विशेषत: महिला प्रशंसक त्याच्या विधानावर निश्चितच नकारात्मक प्रतिसाद देतील, असे वाटते.
- ललिता कुमारमंगलम,
राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष
सलमान खानने माफी मागावी. चुकून जीभ घसरल्याने (स्लीप आॅफ टंग) तो बोलला असावा. मात्र त्याचा बचाव करता येत नाही. त्याने केलेले विश्लेषण चुकीचे होते. स्वत:चा आदर जपणाऱ्या महिलांसाठी त्याने माफी मागायलाच हवी.
- शायना एनसी, भाजपा प्रवक्त्या.