भूतानच्या चिमुकल्या राजकुमारासोबत रमल्या सुषमा स्वराज
By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2017 11:41 PM2017-10-31T23:41:56+5:302017-10-31T23:47:51+5:30
नवी दिल्ली- भारताचा शेजारील देश असलेल्या भूतानचे राजा जिग्मे खेसर नामग्येल वांगचुक चार दिवसांच्या भारताच्या दौ-यावर आहेत.
नवी दिल्ली- भारताचा शेजारील देश असलेल्या भूतानचे राजा जिग्मे खेसर नामग्येल वांगचुक चार दिवसांच्या भारताच्या दौ-यावर आहेत. या दौ-यात त्यांच्यासोबत त्यांची पत्नी जेत्सुन पेमा वांगचुक व राजकुमार जिग्मे नामग्येल वांगचुकही उपस्थित आहेत. परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज या विमानतळावर त्यांच्या स्वागतासाठी गेल्या होत्या. यावेळी राजकुमार जिग्मे नामग्येल वांगचुक उपस्थित सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू होता. सुषमा स्वराजही या चिमुकल्या राजकुमारासोबत विमानतळावरून बाहेर येताना काहीशा रमल्या.
नवी दिल्लीतल्या विमानतळावर हा राज परिवार उतरल्यानंतर परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी त्यांचं विमानतळावर स्वागत केलंय. भूतानचे राजे बुधवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेण्यासाठी राष्ट्रपती भवनातही जाणार आहेत. तसेच त्यानंतर भूतानच्या राजा-राणीचा हा शाही जोडा पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेण्यासाठी दिल्लीतल्या लोककल्याण मार्गावर असलेल्या मोदींच्या बंगल्यावरही जाणार आहे. या दौ-यात भूतानचा राजा केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली, संरक्षण मंत्री निर्मला सीतारमन आणि उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंचीही भेट घेणार आहेत.
भौगोलिक दृष्ट्या भूतान हा भारतासाठी खूप महत्त्वाचा शेजारील देश आहे. हल्लीच डोकलामच्या रस्ते निर्माणावरून भारत व चीनमध्ये वाद झाला होता. त्यावेळी भूताननं भारताची साथ दिली होती. मे 2014ला पंतप्रधान झाल्यानंतर नरेंद्र मोदींनी भूतानपासूनही स्वतःच्या दौ-याची सुरुवात केली होती. भूतानच्या राणीचे भारताशी जुने ऋणानुबंध आहेत. त्यांनी स्वतःचं शालेय शिक्षण हिमाचल प्रदेशमधल्या सनोवर येथील एका प्रख्यात शाळेत पूर्ण केलं आहे.