अफवांनी आगीत ओतले तेल, ‘ती’ घटनाही यामुळेच; विविध सुरक्षा यंत्रणांचा धक्कादायक दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2023 08:50 AM2023-07-24T08:50:35+5:302023-07-24T08:51:01+5:30
मणिपूरमध्ये ३ मे रोजी उसळलेल्या वांशिक हिंसाचारात १६० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला.
इम्फाळ : मणिपूरमध्ये ३ मे रोजी उसळलेल्या वांशिक हिंसाचारात १६० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला. या हिंसाचारात अफवा आणि खोट्या बातम्यांचा मोठा वाटा होता, असे मणिपूरमधील परिस्थितीवर लक्ष ठेवून असलेल्या विविध सुरक्षा यंत्रणांच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
कांगपोकपी जिल्ह्यात ४ मे रोजी दोन महिलांना विवस्त्र करून त्यांची धिंड काढण्यात आल्याच्या प्रकारापूर्वी आदिवासींनी पीडितेची हत्या केल्याचा खोटा दावा करून पॉलिथिनमध्ये गुंडाळलेल्या मृतदेहाचे छायाचित्र इम्फाळ खोऱ्यात प्रसारित झाल्यानंतर हिंसाचार भडकला. नंतर हे चित्र नवी दिल्लीतील एका महिलेच्या हत्येचे असल्याचे आढळून आले; परंतु तोपर्यंत हिंसाचाराने खोऱ्याला वेढले होते. नंतर दुसऱ्या दिवशी ती लज्जास्पद घटना घडली, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. त्याच दिवशी जेमतेम ३० किमी अंतरावर २० वर्षांच्या आणखी दोन तरुणींवर क्रूरपणे बलात्कार करून त्यांची हत्या करण्यात आली.
बनावट चित्रामुळे अराजकता आगीसारखी पसरली. सरकारने इंटरनेट बंद करण्याचे हे एक कारण आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
बिहार, पश्चिम बंगाल आणि राजस्थानमध्ये महिलांवरील हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत असे समजू या; परंतु मणिपूरमधील सततचा हिंसाचार कसा माफ करता येईल? मणिपूरमधील परिस्थितीची बिहार, पश्चिम बंगाल आणि राजस्थानमधील परिस्थितीशी तुलना कशी करता येईल?
- पी. चिदंबरम, ज्येष्ठ नेते, काँग्रेस
मणिपूरमधील जातीय हिंसाचारामुळे संसदेचे पावसाळी अधिवेशन रखडले आहे. विरोधी पक्षांना हात जोडून विनंती की, या विषयावरील चर्चेत सामील व्हावे. ईशान्येकडील राज्यातील महिलांवरील अत्याचाराच्या मुद्यावर विरोधकांनी राजकारण करू नये.
- अनुराग ठाकूर, केंद्रीय मंत्री
आणखी २ मुलींवर ‘गॅंगरेप’
मणिपूरमध्ये विवस्त्र धिंड प्रकरण झाले त्याच दिवशी मणिपूरमध्ये आणखी दोन तरुणींवर बलात्कार करून त्यांची हत्या करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. ही घटना कांगपोकपी जिल्ह्यातील कोनुंग मामांग भागात घडली. दोन्ही तरुणी गॅरेजमध्ये काम करायच्या.
त्या दिवशी हल्लेखोरांमध्ये महिलाही होत्या. महिलांनीच गर्दीत उपस्थित पुरुषांना बलात्कार करण्यास सांगितले. एफआयआरनुसार, दोन्ही मुलींवर बलात्कार, अत्याचार आणि नंतर निर्घृण हत्या करण्यात आली.या घटनेत १००-२०० लोक उपस्थित असल्याचा उल्लेख आहे.