तिहार तुरुंगवासातील 'त्या' गूढ आवाजांनी कैद्यांची उडवली झोप
By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2019 11:07 AM2019-08-02T11:07:50+5:302019-08-02T11:08:08+5:30
तुरुंगवास म्हणजे एक भयंकर शिक्षा, अशी प्रत्येक सामान्य माणसाची धारणा आहे.
नवी दिल्लीः तुरुंगवास म्हणजे एक भयंकर शिक्षा, अशी प्रत्येक सामान्य माणसाची धारणा आहे. गंभीर गुन्ह्यातील आरोपींना बऱ्याचदा तुरुंगवासाची हवा खावी लागते. दिल्लीतलं तिहार तुरुंगही अशा कैद्यांना शिक्षा भोगण्यासाठी प्रसिद्ध आहे. पण तिहारमधले कैदी सध्या दुसऱ्याच कारणास्तव घाबरले आहेत. तिहार तुरुंगात आजकाल चित्र-विचित्र आवाज ऐकायला येऊ लागले आहेत. त्यामुळे महिला कैद्यांमध्ये जास्त करून भीतीचं वातावरण आहे. काही महिला कैद्यांच्या मते, त्यांना रात्री एका महिलेची सावली दिसत असून, ती महिला रडत असल्याचंही ऐकायला येतं. त्यामुळे मध्यरात्री दोन वाजता या कैदी महिला घाबरतात आणि जोरजोरात ओरडू लागतात.
सूत्रांच्या माहितीनुसार, दहशतीची ही स्थिती तिहारमधल्या जेल नंबर 6मध्ये आहेत. बऱ्याचदा रात्री दोन वाजता एक महिला रडत असल्याचा आवाज या महिला कैद्यांना ऐकू येतो. तर काही महिला कैद्यांनी हा आवाज दुपारच्या दरम्यानही ऐकू येत असल्याची तक्रार केली आहे. महिला कैद्यांचा दावा आणि रहस्यमयी आवाजांचं गूढ काय आहे, यासंदर्भात अद्याप काहीही समजलेलं नाही. तिहार तुरुंगवासात अनेक प्रकारच्या अफवा पसरवल्या जात आहेत.
एका कैदी महिलेनं इथे आत्महत्या केली होती, तिचाच आवाज आणि तिचाच आत्मा भडकत दिसत असल्याची चर्चा आहे. आत्महत्या करणारी ती महिला निर्दोष होती, अशीही दबक्या आवाजात चर्चा केली जात आहे. परंतु विज्ञानाच्या जगतात या सर्व गोष्टी काल्पनिक असल्याचंही काहींचं मत आहे. तिहार तुरुंगातील या घटनांनी सध्या कैद्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे. अनेक कैदी या आवाज आणि सावलीमुळे आजारी पडत आहेत.