2 हजार रुपयांची नोट बंद होणार ही अफवा, विश्वास ठेऊ नका- अरूण जेटली
By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2017 09:28 AM2017-12-23T09:28:10+5:302017-12-23T09:30:34+5:30
नोटाबंदीनंतर नव्यानं चलनात आलेली 2000 रुपयांची नोट बंद होणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसापासून सुरु आहे.
गांधीनगर- नोटाबंदीनंतर नव्यानं चलनात आलेली 2000 रुपयांची नोट बंद होणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसापासून सुरु आहे. पण या सर्व चर्चांना केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी पूर्णविराम दिला आहे. 2 हजार रूपयांची नोट बंद होणार ही अफवा असून त्यावर विश्वास ठेवू नका, असं आवाहन अरूण जेटली यांनी केलं आहे.
'अनेक अफवा पसरवल्या जात आहेत,पण त्या चुकीच्या आहेत. जोपर्यंत कोणतीही अधिकृत घोषणा होत नाही तोपर्यंत त्यावर विश्वास ठेऊ नका.' असं केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी गांधीनगर येथे माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे.
Speculations being made. Many such rumors are being spread, which are wrong. Don't believe such things till any official announcement is made: Finance Minister Arun Jaitley on SBI report ( of RBI holding back Rs 2,000 notes) pic.twitter.com/NBjz57fG24
— ANI (@ANI) December 22, 2017
नेमकं प्रकरण काय ?
रिझर्व्ह बॅंकेने गेल्यावर्षी चलनात आणलेल्या दोन हजार रुपयाच्या नोटांची छपाई थांबविली आहे किंवा थांबवणार असल्याचं एका अहवालातून समोर आलं होतं. इतकंच नाही, तर रिझर्व्ह बॅंकेने दोन हजार रुपयांचा नोटा चलनात आणणंसुद्धा बंद केलं आहे, असा अंदाज देशातील सार्वजनिक क्षेत्रात असलेली स्टेट बँक ऑफ इंडियाकडून करण्यात आलेल्या संशोधन अहवालात म्हटलं आहे.
रिझर्व्ह बँकेने गेल्या काही दिवसांत लोकसभेत सादर केलेल्या वार्षिक रिपोर्टच्या आधारे एसबीआय इकोफ्लॅशने आपला अहवाल मांडला. यामध्ये रिझर्व्ह बँकेने 8 डिसेंबर 2017 पर्यंत 15,78,700 कोटी रुपये मुल्य असलेल्या मोठ्या नोटांची छपाई केली आहे. यात 2,46,300 कोटी रुपये मुल्यच्या नोटा रिझर्व्ह बँकेने अद्याप व्यवहारात आणलेल्या नाहीत. यामुळे रंझर्व्ह बँक दोन हजार रुपयाच्या नोटांची छपाई थांबवू शकते, अशी चर्चा होती. तसेच 2,463 अब्ज रुपये मुल्यच्या दोन हजार रुपयाच्या नोटा जारी करण्याऐवजी 50 आणि 200 रुपयाच्या छोट्या चलनी नोटा आरबीआयकडून जारी होण्याची शक्यता आहे, असं एसबीआय समूहाच्या मुख्य आर्थिक सल्लागार सौम्या कांती यांनी आपल्या अहवालात म्हटलं होतं.
याचबरोबर अहवालानुसार, दोन हजार रुपयांच्या नोटांमुळे बाजारात व्यवहारांमध्ये मोठ्या अडचणी येत आहेत. सुट्ट्या पैशांचा प्रश्न गंभीर होत चालल्याने हळूहळू दोन हजार रुपयांच्या नोटांची छपाई रिझर्व्ह बँकेने कमी केली आहे किंवा त्या परत घेण्याच्या तयारीत आहे. तसंच सरकार आणि आरबीआय आर्थिक व्यवहारात 35 टक्के भाग हा छोट्या चलनी नोटाचा ठेवण्याच्या विचारात आहे, असा अंदाजही या अहवालात व्यक्त करण्यात आला होता.