सरकार-पक्षामध्ये समन्वय ठेवून राज्याचा कारभार चालवा; पंतप्रधान मोदींचा भाजपशासित राज्यांच्या मुख्मयंत्र्यांना मंत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2021 05:48 AM2021-12-15T05:48:24+5:302021-12-15T05:48:48+5:30
भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक, स्वराज्याएवढेच सुराज्यही महत्त्वाचे : मोदी
वाराणसी : सरकार आणि पक्षामध्ये समन्वय ठेवून कामकाज करण्यासाेबतच चांगल्या कामांची माहिती जनतेपर्यंत पाेहाेचविण्याचा मंत्र पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना दिला. पुढील वर्षी ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुका हाेणार आहे. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी सर्व भाजपशासित मुख्यमंत्र्यांचे रिपाेर्ट कार्ड जाणून घेतले.
पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी वाराणसी दाैऱ्याच्या दुसऱ्या दिवशी सर्व भाजपशासित मुख्यमंत्र्यांची बैठक घेतली. त्यात उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, कर्नाटक, मणिपूर, आसाम, गुजरात, गाेवा, हरयाणा, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, त्रिपुरा आणि अरुणाचल प्रदेश या राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित हाेते. सरकार आणि पक्षामध्ये समन्वय नसल्याचा यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये फटका बसल्याकडे माेदींनी लक्ष वेधले. यासंदर्भात माेदींनी सूचना दिल्या, की सरकार आणि पक्ष हे दाेन प्रमुख घटक आहेत. त्यांच्यात समन्वय ठेवणे खूप आवश्यक आहे. सर्वांनी काशीमधील विकासकामांची पाहणी करावी. हे माॅडेल आपापल्या राज्यात राबवावे. आपण केलेली चांगली कामे जनतेपर्यंत पाेहाेचविण्याकडेही भर द्यावा, अशा सूचनाही माेदींनी सर्व मुख्यमंत्र्यांना दिल्या.
पंतप्रधानांनी सर्व मुख्यमंत्र्यांना गुड गव्हर्नंन्सवर भर देण्याचीही सूचना केली. बैठकीत सर्व मुख्यमंत्र्यांनी आपापल्या राज्यातील विकासकामे तसेच महत्त्वाच्या याेजनांबाबत प्रेझेंटेशन दिले तसेच भविष्यातील याेजनांचीही माहिती सर्वांनी दिली. सर्वांत माेठे प्रेझेंटेशन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री याेगी आदित्यनाथ यांनी दिले. पुढील वर्षी उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणूक हाेणार आहे. पंतप्रधान माेदी आणि याेगी आदित्यनाथ हे दाेघेही एकाच गाडीने बैठकस्थळी दाखल झाले, हे विशेष. बैठक आटाेपल्यानंतर पंतप्रधान माेदी आणि सर्व मुख्यमंत्री शाहजहापूर येथील भव्य बायाेगॅस केंद्रावर पाेहाेचले. तेथील पाहणी केल्यानंतर सर्व मान्यवर स्वरवेद मंदिरात दाखल झाले.
स्वराज्याएवढेच सुराज्यही महत्त्वाचे : माेदी
देश स्वातंत्र्याची ७५ वर्षे पूर्ण करत आहे. आज स्वराज्याएवढेच सुराज्यही महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी केले. सद्गुरू सदाफलदेव विहंगम याेग संस्थेला ९८ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आयाेजित समारंभात ते बाेलत हाेते. पंतप्रधानांनी नैसर्गिक शेतीवर भर देण्याचे आवाहन यावेळी केले. शून्य बजेट नैसर्गिक शेती एक जनआंदाेलन झाले पाहिजे तसेच याचे सर्व फायदे लाेकांना सांगितले पाहिजे, असे माेदी म्हणाले. दाेन वर्षांनी संस्थेची शतकपूर्ती हाेणार आहे. त्यानिमित्ताने माेदींनी देशवासीयांना दाेन संकल्प घेण्याचे आवाहन केले.
पहिला संकल्प म्हणजे, मुलींच्या शिक्षणाचा. मुलींना कौशल्य विकासासाठी सज्ज करायचे आहे. त्यासाठी ज्यांना शक्य असेल त्यांनी एक किंवा दाेन मुलींची जबाबदारी घेण्याचे आवाहनही माेदींनी केले. दुसरा संकल्प हा देशातील जलस्रोतांना शुद्ध ठेवण्याचा आहे. देशातील सर्व नद्या आणि जलस्रोतांना स्वच्छ ठेवण्याचे आवाहन मोदींनी केले.