रुंगटा यांना चार वर्षांचा कारावास
By admin | Published: April 5, 2016 12:02 AM2016-04-05T00:02:04+5:302016-04-05T00:02:04+5:30
कोळसा वाटप घोटाळ्याच्या संदर्भात विशेष न्यायालयाने सोमवारी झारखंड इस्पात प्रायव्हेट लिमिटेडचे (जेआयपीएल) संचालकद्वय आर. सी. रुंगटा आणि आर. एस. रुंगटा यांना प्रत्येकी
नवी दिल्ली : कोळसा वाटप घोटाळ्याच्या संदर्भात विशेष न्यायालयाने सोमवारी झारखंड इस्पात प्रायव्हेट लिमिटेडचे (जेआयपीएल) संचालकद्वय आर. सी. रुंगटा आणि आर. एस. रुंगटा यांना प्रत्येकी चार वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली. कोळसा घोटाळ्यातील आपला पहिला निकाल जाहीर करताना विशेष सीबीआय न्यायाधीश भरत पाराशर यांनी या दोन्ही आरोपींना कारावासाच्या शिक्षेसोबतच प्रत्येकी पाच लाख रुपयांचा दंडही ठोठावला.
याआधी न्या. पाराशर यांनी या दोघांना झारखंड येथील कोळसा खाणपट्टा मिळविण्यासाठी सरकारची फसवणूक केल्याच्या आरोपात दोषी ठरविले होते. न्या. पाराशर यांनी रुंगटा यांच्यासोबतच आरोपी ठरविण्यात आलेल्या जेआयपीएल कंपनीवर २५ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.
कोळसा घोटाळ्याशी संबंधित विविध प्रकरणांमधील हे पहिलेच प्रकरण आहे की ज्यात दोन्ही रुंगटा आणि जेआयपीएलला दोषी ठरविण्यात येऊन शिक्षा ठोठावण्यात आली आहे. आरोपींनी झारखंडमध्ये कंपनीला उत्तर धादू कोळसा खाणपट्टा वाटप व्हावा यासाठी फसवणूक करण्याच्या इराद्याने सरकारला धोका दिला, असे न्यायालयाने गेल्या २८ फेब्रुवारी रोजी आपला निर्णय देताना म्हटले होते.
उत्तर धादू कोळसा खाणपट्टा जेआयपीएल, मेसर्स इलेक्ट्रो स्टील कास्टिंग लिमिटेड, मेसर्स आधुनिक अलाईज अॅण्ड पावर लिमिटेड आणि मेसर्स पवनजय स्टील अॅण्ड पॉवर लिमिटेड या कंपन्यांना संयुक्तपणे वाटप करण्यात गैरप्रकार झाल्याचे २७ आणि २८ व्या चौकशी समितीने म्हटले होते. याआधी न्यायालयाने रामअवतार केडिया व नरेश महतो या अन्य दोन आरोपींनाही समन्स जारी केला होता. परंतु या दोघांचे निधन झाल्याचे कळल्यानंतर त्यांच्याविरुद्धची कार्यवाही बंद करण्यात आली. कोळसा वाटप घोटाळ्याच्या संदर्भात सीबीआयतर्फे चौकशी करण्यात आलेली आणखी १९ प्रकरणे न्यायालयात प्रलंबित आहेत.