जीव वाचवण्यासाठी पळताना मी पडले आणि...; मणिपूरातील बलात्कार पीडितेची भयावह कहाणी समोर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2023 06:51 AM2023-08-11T06:51:40+5:302023-08-11T06:51:59+5:30
चुराचंदपूर (मणिपूर) : ‘मी जीव वाचवण्यासाठी पळताना पडले, वहिनीने माझ्या मुलांना कसेबसे वाचवून सुरक्षितस्थळी नेले. परंतु, मला पुरुषांच्या एका ...
चुराचंदपूर (मणिपूर) : ‘मी जीव वाचवण्यासाठी पळताना पडले, वहिनीने माझ्या मुलांना कसेबसे वाचवून सुरक्षितस्थळी नेले. परंतु, मला पुरुषांच्या एका गटाने पकडले आणि सामूहिक बलात्कार केला,’ असा आरोप जिल्ह्यातील एका ३७ वर्षीय विवाहित महिलेने केल्यानंतर मणिपूर हिंसाचारात दबलेली आणखी एक भयावह घटना पुढे आली आहे.
मणिपूरमध्ये मे महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या वांशिक संघर्षांदरम्यान लैंगिक अत्याचाराच्या आणखी एका भीषण घटनेत, मदत शिबिरात राहणाऱ्या पीडितेने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. ताज्या प्रकरणात, या महिलेने तक्रारीत म्हटले आहे की, ३ मे रोजी जमावाने तिचे घर जाळल्यानंतर ती तिच्या दोन मुले, भाची आणि वहिनीसह पळून जात होती. त्या वेळी ती पळता पळता पडली आणि पुरुषांच्या तावडीत सापडली. इतर कसेबसे पळून जाण्यात यशस्वी झाले; परंतु, तिच्यावर सामूहिक बलात्कार झाला.
डॉक्टरांमुळे मिळाले तक्रारीचे बळ
महिलेने सांगितले की, सामूहिक बलात्कारानंतर प्रकृतीचा त्रास वाढल्याने मंगळवारी ती इंफाळमधील जेएनआयएमएस रुग्णालयात गेली. तेथे डॉक्टरांनी तिच्यावर उपचार आणि समुपदेशन केले, ज्यामुळे तिला या प्रकरणाची तक्रार करण्याचे बळ मिळाले.
महिलांनी इंफाळमध्ये मशाल रॅली काढली
इंफाळ : संसदेचे पावसाळी अधिवेशन संपण्यापूर्वी मणिपूर विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी करत शेकडो महिलांनी बुधवारी रात्री इंफाळ खोऱ्यात मशाल मोर्चा काढला. बुधवारी रात्री साडेनऊच्या सुमारास इंफाळ पश्चिम जिल्ह्यातील केसमपट, केसमथोंग आणि क्वाकेथेल आणि इंफाळ पूर्व जिल्ह्यातील वांगखेई आणि कोंगबा येथे मोर्चा काढण्यात आला.
कुटुंबाची बदनामी वाचवण्यासाठी गप्प बसले
महिलेने सांगितले की, ‘माझी आणि माझ्या कुटुंबाची बदनामी आणि सामाजिक बहिष्कार टाळण्यासाठी मी ही घटना उघड केली नाही. त्यामुळेच ही तक्रार दाखल करण्यास उशीर झाला आहे. मला तर आत्महत्येची इच्छा होती.’ बुधवारी बिष्णुपूर पोलिस ठाण्यात दाखल केलेल्या ‘झिरो एफआयआर’सोबत तिने सांगितले की, ती आता विस्थापितांच्या मदत छावणीत राहत आहे. भादंविच्या कलम ३७६ डी, ३५४, १२० बी आणि ३४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.