खासदारांच्या स्वागतासाठी दिल्लीत धावपळ सुरू, लोकसभा सचिवालयाची जोरदार तयारी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2024 05:20 AM2024-06-04T05:20:20+5:302024-06-04T06:58:06+5:30

Lok Sabha Election 2024 :मतदान झाल्यानंतर निवडणूक आयोग सर्वात प्रथम निवडून आलेल्या उमेदवारांची यादी जाहीर करेल.

Rushing begins in Delhi to welcome MPs, Loksabha Secretariat is making vigorous preparations | खासदारांच्या स्वागतासाठी दिल्लीत धावपळ सुरू, लोकसभा सचिवालयाची जोरदार तयारी

खासदारांच्या स्वागतासाठी दिल्लीत धावपळ सुरू, लोकसभा सचिवालयाची जोरदार तयारी

नवी दिल्ली : १८व्या लोकसभेत कोण कोण सदस्य येणार याचा निर्णय मंगळवारी (दि. ४) सायंकाळपर्यंत होणार आहे. नवीन खासदारांच्या स्वागतासाठी लोकसभा सचिवालयही जोरात तयारी करत आहे. यासाठी अनेक व्यवस्था तयार करण्यात आल्या आहेत. अधिकाऱ्यांची पूर्ण एक टीम या कामामध्ये गुंतली आहे. दिल्लीतील सरकारी गेस्ट हाउस आणि पश्चिम कोर्ट हॉस्टेल परिसरात नव्या खासदारांची राहण्यासाठी सोय करण्यात येणार आहे.
मतदान झाल्यानंतर निवडणूक आयोग सर्वात प्रथम निवडून आलेल्या उमेदवारांची यादी जाहीर करेल. यानंतर निवडून आलेले  खासदार दिल्लीत येण्यास सुरुवात करतील, असे सांगण्यात आले. 

खासदारांना दिल्लीत आल्यावर काय मिळणार?
प्रवासाच्या सुरुवातीला लोकसभा सचिवालयाचे अधिकारी त्यांच्याशी संपर्क साधतील आणि दिल्लीत त्यांचे स्वागत करतील. यासाठी विमानतळावर विशेष स्वागत कक्ष बनविण्यात आले आहेत. स्वागत केल्यानंतर खासदारांना ॲनेक्सी इमारतीमध्ये आणले जाईल. यानंतर त्यांना फोन कनेक्शन, नवीन बँक खाते, संसद भवनात प्रवेशासाठी लागणारे स्मार्ट ॲक्सेस कार्ड, वाहनांसाठी फास्टॅग स्टिकर आणि पासपोर्टसह अनेक महत्त्वाचे कागदपत्रे उपलब्ध करून दिली जातील.

पेपरलेस प्रक्रिया राबवणार, खासदारांचा वेळ वाचणार
यावेळी लोकसभा सचिवालयातील नवीन खासदारांच्या नोंदणीची प्रक्रिया पूर्णपणे पेपरलेस करण्यात आली आहे. नवनिर्वाचित सदस्यांची नोंदणी प्रक्रिया ऑनलाइन एकात्मिक सॉफ्टवेअर ॲप्लिकेशनद्वारे पूर्ण केली जाईल.
ही प्रक्रिया ५ जून ते १४ जूनपर्यंत सुरू राहणार आहे. या कालावधीत शनिवार आणि रविवारीही नोंदणी सुरू राहील. खासदारांना फॉर्मवर स्वाक्षरी करण्याची आवश्यकता लागणार नाही.
यामुळे खासदारांचा बराच वेळ वाचणार आहे. हे ॲप्लिकेशन केवळ खासदाराचा बायो-प्रोफाइल डेटाच कॅप्चर करत नाही, तर फेशियल आणि बायोमेट्रिक कॅप्चरिंगच्या आधारावर संसद ओळखपत्र देईल. याचवेळी खासदाराच्या जोडीदारालाही सीजीएचएस कार्ड देण्यात येईल.

Web Title: Rushing begins in Delhi to welcome MPs, Loksabha Secretariat is making vigorous preparations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.