पंतप्रधान नरेंद्र मोदींना रशियाकडून सर्वोच्च सन्मान जाहीर
By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2019 03:15 PM2019-04-12T15:15:47+5:302019-04-12T15:38:02+5:30
द्विपक्षीय संबंध सुधारल्याबद्दल होणार गौरव
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदींना आणखी एक मानाचा सन्मान जाहीर झाला आहे. रशियातील सर्वोच्च अशा 'ऑर्डर ऑफ सेंट अँड्रू द अपोसल पदका'नं मोदींचा गौरव करण्यात येणार आहे. रशिया आणि भारत यांच्यातील संबंध वेगळ्या उंचीवर नेल्याबद्दल मोदींना हा पुरस्कार देण्यात येईल. रशियन दूतावासानं ट्विट करुन ही माहिती दिली.
द्विपक्षीय संबंध सुधारण्यासाठी आणि सामरिक सहकार्य करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेले प्रयत्न कौतुकास्पद असल्याचं रशियन दूतावासानं म्हटलं आहे. यासाठी मोदींना 'ऑर्डर ऑफ सेंट अँड्रू द अपोसल पदका'नं सन्मानित करण्यात येईल. हा रशियाचा सर्वाच्च पुरस्कार मानला जातो. रशियाकडून दिला जाणाऱ्या या सन्मानाला मोठा इतिहास आहे. 17 व्या शतकापासून हा पुरस्कार दिला जातो. पीटर द ग्रेटनं या पुरस्काराची मुहूर्तमेढ रोवली. त्यानंतर सोव्हिएत रशियानं 1918 मध्ये हा पुरस्कार बंद केला होता. 1998 मध्ये हा पुरस्कार पुन्हा सुरू करण्यात आला.
उत्तम कामगिरी करणारे राजकीय नेते आणि प्रसिद्ध व्यक्तींचा सेंट अँड्रू द अपोसल पदकानं सन्मान करण्यात येतो. 2017 मध्ये चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांना हा सन्मान देण्यात आला होता. गेल्याच आठवड्यात (4 एप्रिल) मोदींना यूएईकडून सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर झाला. या महिन्याच्या शेवटी यूएईकडून मोदींना 'झाएद पदका'नं गौरवलं जाण्याची शक्यता आहे. सध्या मोदी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त असल्यानं हा सन्मान नेमका कधी दिला जाणार, याची तारीख ठरलेली नाही. मोदींना दक्षिण कोरिया, सौदी अरेबिया, पॅलेस्टाईन आणि अफगाणिस्ताननं सर्वोच्च सन्मानानं गौरवलं आहे.