Russia-Ukraine War: रशिया-युक्रेनमधील युद्धकाळात मोदी युरोप दौऱ्यावर जाणार; कोणत्या देशांना भेट देणार...
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2022 11:50 AM2022-04-27T11:50:19+5:302022-04-27T11:50:51+5:30
मोदी हे जर्मनीचे चान्सेलर ओलाफ शोल्ज यांच्यासोबत द्विपक्षीय़ चर्चा करणार आहेत. याशिवाय भारत-जर्मनीमध्ये सहावी सरकारांतर्गत बैठक होणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा या वर्षातील परदेशवारीचे टाईम टेबल जारी झाले आहे. परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार रशिया-युक्रेनच्या युद्धाच्या काळात मोदी दोन ते चार मे ला युरोप दौऱ्यावर जाणार आहेत. ते या काळात जर्मनी, डेन्मार्क आणि फ्रान्सच्या दौऱ्यावर असणार आहेत.
मोदी हे जर्मनीचे चान्सेलर ओलाफ शोल्ज यांच्यासोबत द्विपक्षीय़ चर्चा करणार आहेत. याशिवाय भारत-जर्मनीमध्ये सहावी अंतर्सरकारी बैठक होणार आहे. या बैठकीलाही ते उपस्थित राहणार आहेत. दोन दिवसांपूर्वीच परराष्ट्र मंत्र्यांनी युरोपला फटकारले होते. भारताने रशियाशी संबंध कमी करावेत, तेल, शस्त्रास्त्रे व अन्य व्यवहार करू नयेत, असा दबाव टाकला जात आहे.
या साऱ्या घडामोडींवर मोदी युरोपच्या दौऱ्यावर जात आहेत. याचबरोबर रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव यांनी देखील भारताने युक्रेन युद्धावर मध्यस्थी केली तर आम्हाला त्यावर काहीही आक्षेप नसेल असे म्हटले होते. यामुळे युरोपचे दोन महत्वाचे देश जर्मनी आणि फ्रान्सची मदत मोदी घेण्याची शक्यता आहे. हा दौरा जरी भारताच्या हितसंबंधांवर असला तरी रशिया आणि युक्रेनवर चर्चा होणार नाही असे शक्य नाहीय. य़ामुळे मोदी या दौऱ्यात या प्रश्नावरही चर्चा करण्याची शक्यता आहे.
जयशंकर काय म्हणालेले...
जयशंकर यांनी सांगितले की, तुम्ही युक्रेनबाबत मुद्दा मांडला. मला आठवतंय की, एक वर्षभरापूर्वी अफगाणिस्तानमध्ये काय झालं होतं. तिथे संपूर्ण समाजाला जगाने आपल्या स्वार्थासाठी नरकात ढकलले. त्यांनी पुढे सांगितले की. मी खूप प्रामाणिकपणे सांगतो की, आम्ही सर्वजण आपला विश्वास आणि आवडींमध्ये आपल्या अनुभवाचा योग्य ताळमेळ शोधला पाहिजे. सर्वजण याला आपापल्या दृष्टिकोनातून पाहतात. सर्व देशांचे प्राधान्यक्रम वेगळे आणि ते तसे असणं स्वाभाविक आहे, असे जयशंकर यांनी सांगितले.